गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे प्रतिपादन; एमपीजीच्या 12 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ
पुणे । राजकारणात येणार्या प्रत्येक युवकाला एक नवा समाज अभिप्रेत असतो. मात्र वरिष्ठांकडून जो समाज त्यांच्या समोर ठेवला जातो त्याचे अनुकरण सावधपणे करावे. या क्षेत्रात काम करताना अनेक अडथळे समोर येतात. त्यांचा अत्यंत खंबीरपणे सामना करावा लागतो. सोबतच या क्षेत्रात काम करावयाचे असेल तर पाय जमिनीवर, डोळे आकाशाकडे आणि मनात केवळ समाजाचा विचार ठेवूनच काम करणे अपेक्षित असते, असे विश्लेषण गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या एमपीजी प्रोग्रामच्या 12व्या तुकडीचा पदवीदान समारंभ सोहळा एमआयटीच्या विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. विश्वनाथ कराड, खा. डॉ. नरेंद्र जाधव, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, काँग्रसचे राजू वाघमारे, प्रकाश जोशी, प्रा. राहुल कराड, डॉ. शैलश्री हरिदास, डॉ. शरदचंद्र दराडे पाटील, डी.पी. आपटे हे उपस्थित होते.
ध्येय उच्च असणे आवश्यक
डॉ. जाधव म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपले ध्येय उच्च स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी आपली सकारात्मक मनोवृत्ती अत्यंत आवश्यक असते. राजू वाघमारे, विद्या चव्हाण आणि प्रा. राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हरिदास यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महेश केळकर यांनी केले. डी.पी. आपटे यांनी आभार मानले.
यावेळी 12व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या बॅचमध्ये उत्तम कामगिरी करीत सुवर्ण पदक मिळविणार्या श्रीनिवास शेरे, लाविश जैन, गौरव कळमकर व चंद्र हर्ष यांचा विशेष सत्कार केला.
भारतीय संस्कृतीत भक्कम राहण्याचे गुण
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्येच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक दक्षता आणि भावनिक पातळीवर भक्कम राहण्याचे गुण आहेत. याच गुणांच्या आधारे आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.