राजकारणाशिवाय इतर मुद्द्यांकडेही लक्ष द्या!

0

चेन्नई : महात्मा गांधींनी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले होते. पत्रकारांकडे नक्कीच शक्ती असते. पण त्याचा चुकीचा वापर करणे गुन्हा आहे. राजकारणाशिवाय इतर मुद्द्यावरही प्रसारमाध्यमांनी लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चेन्नईत एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांची भेट घेतली. या भेटीत चेन्नईसह राज्यातील अनेक भागांतील पाऊस आणि पूरस्थितीवर चर्चा झाली. मागील चारवर्षांपासून आजारी असलेले माजी मुख्यमंत्री, डीएमकेप्रमुख एम. करुणानिधी यांचीही भेट मोदींनी घेतली.

संपूर्ण मदतीचे आश्वासन
चेन्नईसह तमिळनाडूच्या अनेक भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेकांचे बळी गेले आहेत. सोमवारी पंतप्रधानांनी चेन्नई दौर्‍यात या मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. पलानीसामी यांना केंद्राकडून संपूर्ण मदत देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. दरम्यान, पंतप्रधानांनी दुपारी 12 वाजता करुणानिधी यांची गोपालापुरम या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

लेखन स्वातंत्र्याचा गैरवापर नको
चेन्नईतील एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माध्यमे ही समाजात बदल घडवून आणण्याची साधने असतात. ते तुम्हाला केवळ बातम्या देतात असे नसून, ते तुमचे विचार व्यापक बनवण्याचे कामही करतात. माध्यमांनी स्वतःदेखील व्यापक व्हावे. माध्यमांमध्ये चांगली स्पर्धा असणे ही लोकशाहीची शक्ती आहे. भारताच्या प्रादेशिक वृत्तपत्रांची शक्ती पाहून ब्रिटीशही घाबरून पळून गेले होते. आजही प्रादेशिक भाषांची शक्ती तेवढीच आहे. संपादकीय स्वातंत्र्याचा वापर जनहिताच्या मुद्द्यांसाठी करायला हवा. लिखाणाचे स्वातंत्र्य म्हणजे, लोकांना चुकीची माहिती देणे असे नव्हे, असे मोदी म्हणाले.

माध्यमे राजकारणाच्या आसपासच फिरतात
पंतप्रधान म्हणाले, महात्मा गांधींनी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले होते. पत्रकारांकडे नक्कीच शक्ती असते. पण त्याचा चुकीचा वापर करणे गुन्हा आहे. सध्या बहुतांश प्रसारमाध्यमेही राजकारणाच्या आसपासच फिरत असतात. राजकारणाशिवाय इतरही काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांची दखल माध्यमांनी घेतली पाहिजे. भारतात राजकारणाशिवाय इतरही बरेच काही आहे. देशाची 125 कोटी जनता त्याबाबत वाचल्यानंतर आनंदी होत असते. माध्यमांनी स्वच्छ भारत मोहिमेत, महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मातो. त्याचबरोबर एक भारत श्रेष्ठ भारत तयार करण्यासाठीही माध्यमांची जबाबदारी महत्त्वाची आहे.