राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ; हरभरा खरेदी नाही

0
भुसावळ शहर व तालुक्यात शेतकर्‍यांना फटका
भुसावळ:- शहरातील राजकीय उदासीनतेमुळे हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शहर व तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे भुसावळ तालुक्यातील हमी भावाने हरभरा खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडे प्रस्ताव दिल्यानंतरही शासनाने या ठरावाला मुठमाती दिली आहे. यापूर्वीही बाजार समितीने तुर आणि उडीद मुग खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव दिला मात्र यावेळीदेखील शासनाने या मागणीकडे दूर्लक्ष केले. शासनाच्या या दुर्लक्षाने मात्र तालुक्यातील शेतकर्‍यांची उपेक्षा कायम आहे.
अल्प भावाचा शेतकर्‍यांना फटका
खरेदी केंद्र सुरू नसल्याने चार हजार 400 रुपये हमीभावाऐवजी शेतकर्‍यांना केवळ तीन हजार 200 ते तीन 700या दरात हरभरा विकाावा लागत असून मोठा फटकाही सोसावा लागत आहे. जिरायती क्षेत्र अधिक असलेल्या भुसावळ तालुक्यात खरीपात उडीद-मूग आणि तुरीचे अधिक उत्पन्न मिळाले मात्र तालुक्यासाठी उडीद-मूग आणि तुर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यासह तब्बल तीन हजार 500 हजार हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी असल्याने हरभर्‍यातूनही शेतकर्‍यांना उत्पन्न मिळाले आहे. मात्र आता नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.
मागेल त्या भावात खरेदी
हमी भावाने हरभरा विक्रीतून शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल चार हजार 400 रुपये दर मिळत आहे मात्र हे खरेदी केंद्र सुरू न झाल्याने सध्या व्यापार्‍यांकडून केवळ तीन हजार 400 ते तीन हजार 700 रुपये दराने हरभरा खरेदी होत आहे यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागत आहे.