बारामती (वसंत घुले ) : बारामती विधानसभेसाठी ‘बारामतीतून रोहित पवार, अजितदादा कर्जत-जामखेडला जाणार? या शिर्षकाखाली दैनिक जनशक्तिने 2 नोव्हेंबररोजी वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्तावर नगर जिल्ह्यातील तसेच इतर काही जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आमच्याकडे नेतृत्त्वगुण नाहीत काय? आम्ही लोकांचा विकास करीत नाही काय? मग हे स्थलांतरीत नेतृत्त्व लादणे आम्ही कदापिही मान्य करणार नाही. आम्हाला आमच्या भागातल्या समस्या माहित आहेत. आमच्या छोट्या मोठ्या कामांसाठी संबंधित नेत्यांना भेटण्यासाठी आम्हाला त्यांच्या गावाकडे जावे लागणार काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
आमदार, खासदार होण्याची प्रस्थापितांच्या मुलांची इच्छा
नगर जिल्ह्यातील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मुळातच तिसर्या, चौथ्या पिढीची राजकीय सोय लावण्याकरिता मतदारसंघासाठी अशाप्रकारे स्थलांतर करू इच्छिणार्या नेत्यांना त्याच जिल्ह्यातील इतर मतदारसंघ असू शकतात. त्यामुळे असा प्रयत्न करणे अवघड आहे. तसेच बेभरवशाचे आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: पुणे, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यातील धनाढ्य नेत्यांची मुले सत्तेसाठी सैरभैर झाली आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण आमदार, खासदार झालेच पाहिजे अशा महत्वांकांक्षेने ती पछाडलेली आहेत. या नेत्यांच्या सामाजिक संकल्पनाही वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. रक्तदान शिबिर, वाढदिवस, मोठमोठे फ्लेक्स, मंत्र्यांना आणून भव्य सोहळे करून उद्घाटन करणे, देवाधर्माला माणसे पाठविणे, जेवणावळी घालणे इत्यादी स्वरूपात त्यांची नेतेगिरी सुरू असते. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील समस्या व सर्वसामान्यांच्या अडचणी याविषयी मात्र हे नेते जास्त बोलतच नाहीत. ही खरी शोकांतिका आहे.
मतदारसंघासाठी स्थलांतर धाडसाचा प्रयोग
खरे तर अकलूज येथील आमदार व माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे तर शेजारील आपल्याच जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आमदारकीचे नशीब अजमावयाला गेले होते. माळशिरस हा तालुका अनुसूचित जमाती या जागेसाठी आरक्षित झालेला होता. पण सत्तेशिवाय बेचैन असलेले लोक अनेक प्रयोग करायला निघतात. असाच हा प्रयोग होता. परंतु, पंढरपूरकरांनी मोहिते-पाटलांना पराभूत करून पुन्हा अकलूज येथे पाठविले. हा इतिहास ताजाच आहे. तरीही प्रयोगाचे धाडस करणारे थांबत नाहीत. तद्वतच या घटनांमधून शिकून काहीजण आपला मोर्चा विधानपरिषदेकडे वळवितात. दैनिक जनशक्तिने प्रसिध्द केलेल्या या वृत्तामुळे या विषयाला वाट करून दिली. हा विषय नव्याने परत एकदा सुरू झालेला असून, जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे याचे राज्यभर पडसाद उमटणार आहेत.