नाथाभाऊ उवाच- आता पक्षाकडून अजिबात अपेक्षाच नाहीत ; नाथाभाऊंचे पाय चाटणार्यांनी ‘बाप’ बदलला
मुक्ताईनगर (गणेश वाघ)- कधी काळी नाथाभाऊंचे पाय चाटणार्यांनी तुम्हीच आमचे राजकारणातील बाप आहात, असे सांगितले होते मात्र आता त्यांनी आता बापही बदलले असून बापही बदलणारी माणसे मी राजकारणात प्रथम पाहिली असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्पष्टपणे सांगत गेल्या 40 वर्षांपासून अव्याहतपणे भाजपा पक्ष वाढविण्यासाठी काम करीत असून आपल्या राजकीय जीवनातील चूक सांगावी, आतापासून आपण राजकारण सोडू, असा सूचक ईशारा पालकमंत्री व राज्यमंत्र्यांसमोर देत खळबळ उडवून दिली. श्री क्षेत्र कोथळी येथे 66 व्या वाढदिवसानिमित्त खडसे यांचा रविवारी दुपारी जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खडसे यांनी गेल्या 28 महिन्यांच्या काळात झालेल्या आरोपांचा समाचार घेत आता मला सर्व आरोपातून क्लीनचिट मिळाल्याने आता राज्य सरकारची मी निर्दोष आहे, हे सांगण्याची जवाबदारी असल्याचे सांगत आता आपल्याला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, असे सांगत मी चुकलो कुठे ? या संदर्भात राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये यल्गार आंदोलन यापुढे असणार असल्याचा गर्भगळीत ईशारा देत भाजपा पक्ष मात्र कदापिही सोडणार नसल्याचेही सांगून उपस्थितांना बुचकळ्यात टाकले.
अल्पसंख्यांकांसाठीचे पहिले महाविद्यालय
नागरी सत्काराला उत्तर देताना खडसे म्हणाले की, मुक्ताईनगरातील सालबर्डी येथे अल्पसंख्यांकांसाठी राज्यातील पहिले तंत्र निकेतन महाविद्यालय होत आहे. भाजपा सरकार मायनॉरिटी विरोधात नसल्याचे सांगत पहिल्या वर्षी 300 तर दुसर्या वर्षी 300 विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले शिवाय या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नसल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. आपण मंत्री पदावर असताना राज्यात 12 वसतिगृह मंजूर केली त्यातील दोन जळगावात असून एक उमवित तर दुसरी इंजिनिअरींग महाविद्यालयात असल्याचे खडसे म्हणाले. सालबर्डी येथेदेखील मुला-मुलींसाठी वसतिगृह होणार असल्याचे ते म्हणाले.
40 वर्षांपासून पक्षासाठी संघर्ष
खडसे म्हणाले की, गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी आपला संघर्ष सुरू आहे. डॉ.गुणवंतराव सरोदे व स्व.फडके यांच्या योगदानामुळे पक्ष वाढला शिवाय 1980 च्या दशकात पक्षाचा एकही जि.प. वा पं.स.सदस्य नव्हता त्यावेळी आपण निवडून आलो व त्यानंतर जिल्हा बँकेच्या सहकार क्षेत्रात असो वा राजकारणात असो पक्ष वाढतच गेल्याचे ते म्हणाले. ज्या पक्षासाठी 40 वर्षांपासून संघर्ष केला त्या पक्षात आता मी बदमाश कसा झालो ? असा भावनाविवश प्रश्न त्यांनी उपस्थितांपुढे केला. विरोधी पक्षात असताना आपण त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बदमाश, नालायक म्हणण्याची हिंमत केली कारण एक पैसाही आपण कुणाचा खाल्ला नव्हता वा आजही आपण कुणाचेही दबलेलो नाही. 16 हजार बेरोजगारांना आपण नोकरीवर लावले, तेही एक पैसा न घेता त्यामुळे आपल्यावर झालेल्या निरर्थक आरोपांचा खुलासा करण्याची आता सरकारची जवाबदारी असल्याचे ते म्हणाले.
चौकशा झाल्या मग आता खुलासेही करा
कधी दाऊदच्या बायकोशी संभाषण, कधी पीएने मागितलेली 30 कोटींची लाच, जावयाची लिमोझीन कार, भोसरीतील जमीन प्रकरण, दहा हजार कोटींची जमवलेली अपसंपदा या शिवाय एक ना अनेक प्रकरणात आपल्यावर सातत्याने बिनबुडाचे आरोप झाले शिवाय प्रिंड मिडीयासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी महिनाभर त्याचे प्रसारण केले मात्र सर्व आरोपातून आपली निर्दोष सुटका झाल्याने आता सरकारची मी निर्दोष आहे, हे सांगण्याची जवाबदारी असल्याचे खडसे म्हणाले. कधी एटीएस तर कधी एसीबीने खोलवर चौकशी केल्या मात्र त्यात निष्पन्न काहीही झालेले नाही. चंद्रकांत दादा मंत्री मंडळात दोन नंबरचे मंत्री आहेत शिवाय त्यांचे वरपर्यंत वजनही आहे त्यामुळे त्यांनी आमच्या भावना वरपर्यत पोहोचाव्यात, अशी अपेक्षा खडसेंनी केली.
तर सरकार का सांगत नाही मी ‘क्लीनचीट’ -खडसेंचा उद्विग्न सवाल
नाथाभाऊ चोर, उच्चका, बदमाश आहे तर सरकार का त्याबाबत खुलासा करीत नाही? असा खोचक सवाल खडसेंनी पालकमंत्र्यांना उपस्थित करताच चंद्रकांत दादांना डोक्याला हात लावण्याची वेळ आणल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. कधी सायकलवर तर कधी पायी प्रवास केला व पक्षाची ध्येय-धोरणे पोहोचवून पक्ष वाढवला, असे सांगताच खडसे काहीसे गहिवरले. मी जर चुकीचा असेल तर सरकारने जनतेपुढे सांगावे मग मी जनतेची माफिही मागेल मात्र मी कुठे चुकलो ? हे तर सांगा, असे भावनाविवश उद्गारही खडसेंनी काढले. वाढदिवस असल्याने अशा गोष्टी मुळात मला बोलायच्या नव्हत्यात मात्र पत्रकार मला खाजगीत विचारतात भाऊ तुमचा वाढदिवशी संकल्प काय आहे तर आजपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जावून जनतेला आपण विचारणार आहोत की नाथाभाऊ चुकला कुठे? हे त्यांनी सांगावे, असेही खडसे यांनी सांगत दिवार चित्रपटातील डॉयलॉगची आठवण करून देत आपल्याकडे पैसा, जमीन, जुमला ही संपत्ती नाही तर मतदार व माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते ही आपली संपत्ती आहे, असे खडसे म्हणतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
ज्याचे ढुंकण खरगटे आहे त्यांच्यातच बोलण्याची हिंमत नाही
मध्यप्रदेशचे खासदार नंदकुमार चव्हाण यांच्या भाषणाचा धागा पकडत खडसे म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता असताना सत्ताधार्यांच्या पाचावर धार बसायची याचा अर्थ मी पुन्हा विरोधी पार्टीत जायचे असे वाटते का? असा सूचक सवाल उपस्थित होताच सभामंडपातून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर खडसे म्हणाले की, आमचा ‘पक्ष न खाऊंगा न खाने दुंगा’ या तत्वावर आधारीत असून यापुढेही पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी सांगितले. ज्यांचे ढुंगण खरगटे आहे त्याच्यात बोलण्याची हिंमत नाही, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोष भरला. डीपीडीसीतून निधी मिळण्यासाठी आमचे आमदार हरीभाऊ जावळे रडून-रडून थकले मात्र प्रत्यक्षात काहीही त्यांच्या पदरात पडलेले नाही, असा खोचक टोलाही खडसेंनी लगावला. सत्य स्विकारा मात्र चुकलो असेल तर पोटात घाला, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.