कारवाईबद्दल आशा राऊत यांचे कौतुक
पिंपरी : पिंपरी- शहराला दिवसेंदिवस टपर्यांचा विळखा घातला जातोय. मात्र यामुळे शहराच्या बकालपणात वाढ होतेय. तसेच व्यसनाधिनता, गुंडगिरी वाढते आहे. शहराला टपरीमुक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. अधिकृत टपरीधारकांना हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी हॉकर्स झोनची निर्मीती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अनधिकृत टपर्यांचे प्रमाण अधिक असल्याने तब्बल सात वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 119 टपर्या, हातगाड्या, टेम्पोवर कारवाई कऱण्यात आली. ही कारवाई करताना अनेक समस्यांचा सामना संबंधित अधिकारी आशा राऊत यांना करावा लागला. मात्र कारवाई तीन दिवसांत पूर्ण केली असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
शहरात अनेक चौकामध्ये टपर्यांचा विळखा दिसतो आहे. 2012 मध्ये जेव्हा कारवाई झाली, तेव्हा शंभरच्या जवळपाससुध्दा टपर्या नव्हत्या. त्याच टपर्यांची संख्या आता संत तुकाराम नगरमध्ये सहाशेच्या आसपास पोहचली आहे. नेत्यांच्या समर्थकांच्या टपर्या असल्यामुळे तसेच हफ्तेवसुलीमुळे दिवसेंदिवस टपर्यांच्या संख्येत शहरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहर हे टपर्यांचे शहर म्हणून ओळखू नये यासाठी कारवाई करणे आवश्यक होते, त्यानुसार कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान भेदभाव केल्याचा आरोप त्या अधिकार्यांवर करून महापालिकेवर काही कार्यकर्त्यांनी मोर्चा आणला होता. मात्र या कारवाई दरम्यान कुठलाही भेदभाव न करता ज्या टपर्यांकडे महापालिकेचे कुठलेही कागदपत्र नाहीत, शिवाय कुठलाही पुरावा नाही अशा टपर्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सलग तीन दिवस त्याठिकाणी उपस्थित राहून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ह प्रभाग अधिकारी आशा राऊत यांनी दिली.
राऊत यांची धडक कामगिरी
पिंपरी-चिंचवड महापालिकाच नव्हे तर वाई नगरपालिकेत त्यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या कामगिरी लक्षात घेऊनच त्यांच्यावर ह प्रभाग अधिकार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी संत तुकाराम नगरमधील कारवाई करून आपली चमकदार कागरिरी केली आहे. यापूर्वी 2012 मध्ये सध्याचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी कारवाई करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तरीही त्यांनी कारवाई करण्याचे काम पूर्ण केले होते. त्यांच्यानंतर धडाकेबाज कामगिरी करणार्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून राऊत यांचे कौतुक केले आहे.