मुंबई । मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मताधिकार बजावला. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मातोश्री सरिता फडणवीस यांच्यासह मताधिकाराचा हक्क बजावला. मुंबईमध्ये आज सकाळी राजकीय नेत्यांनी मताधिकार बजावला. आतापर्यंत ना. रामदास आठवले, ना.विनोद तावडे, ना. दिवाकर रावते, ना. सुभाष देसाई, ना. प्रकाश महेता, ना. डॉ. दीपक सावंत, ना. रवींद्र वायकर तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत आपली नात रेवती सुळे हिच्यासह मतदान केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, मनसे प्रमुख राज ठाकरे, खासदार पूनम महाजन, निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी आपापल्या मतदारसंघात मतदान केले.
कलावंत, उद्योगपती, खेळाडू पडले घराबाहेर
याशिवाय अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, रेखा, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अभिनेते नाना पाटेकर, शाहरूख खान, सुनील बर्वे, रणबीर सिंग, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा, सुप्रसिद्ध उद्योजक टीना अंबानी, क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी सकाळीच मताधिकार बजावला. यावेळी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पुण्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, अमरावतीमध्ये उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सांगलीमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.