नागोठणे । रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशा नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सावधपणे मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली तरी, अनेक दशके सत्ताधारी राहिलेली काँग्रेस, जि. प., पं. स. निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा शिवसेनेच्या मागे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील कट्टर काँग्रेसजन सेनेशी घरोबा करायला नाराज असल्याची कुजबुज होताना दिसून येत आहेत. मात्र, बाहेरून काँग्रेसची काही ’मंडळी’ शहरात येऊन पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर जाणे, काँग्रेसला कसे फायद्याचे आहे ! याची सामान्य, मात्र कट्टर काँग्रेसजनांसमोर मल्लिनाथी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या नेहमीप्रमाणे सरपंच किंवा सदस्य पदाची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काही विद्यमान तसेच माजी सदस्य आणि आपले ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून जाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे असे स्पष्ट होत आहे. उमेदवारी अर्ज 5 ते 10 फेब्रुवारीदरम्यान भरले जाणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असल्याने पर्यायाने सरपंच किंवा सदस्यपदाची उमेदवारी मिळावी यासाठी या पक्षात संभाव्य उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सरपंच, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी शिवसेनेत अनेक इच्छुक असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
तरुणांचा कल कोणाकडे झुकणाऱ्या
शेकापने, राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रस्ताव नुकताच मांडला आहे व या दोन पक्षांची आघाडी होण्याचे चित्र जवळपास नक्की झाले असले, तरी सरपंचपदाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्याच एका माजी ग्रा. पं. सदस्याचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे. गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तुलनेत अंदाजे एक हजार मतदार वाढले आहेत. त्यामुळे तरुणांचा कल कोणाकडे झुकू शकेल, त्यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल.