जळगाव : लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री झाल्यानुसार मद्यविक्रीच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणेच शहरातील पुढार्यासह बडे व्यावसायिकांची दुकानांची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी निवेदनाव्दारेकडे मंत्र्यांसह जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील केलेल्या तपासणीत संबंधित सहा दुकानांमध्ये मुदत बाह्य साठा तसेच मद्यसाठ्यात तफावत तसेच साठ्याबाबत नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार संबंधित दुकानांवर काय कारवाई होते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
या मद्यविक्रीच्या दुकानांची तपासणी
राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्निल फेगडे , अॅड. कुणाल पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी एकाचवेळी मद्य विक्री करणार्या सहा दुकानांवर छापे घातले. यात नवी पेठेतील नीलम वाईन्स, नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स,बांभोरी येथील विनोद वाईन्स व पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली.
दुकानामध्ये अशा आढळल्या त्रृटी
-विजय सेल्समध्ये तीन दिवसाच्या नोंदी नव्हत्या तसेच विदेशी, देशी व बियरच्या साठ्यात तफावत आढळून आली.
-नीलम वाईन्समध्ये 21 मार्चची नोंद नाही तसेच मद्यसाठ्यातही तफावत आढळून आली.
-गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन या दुकानात मुदत संपलेला (कालबाह्य) बियरचा साठा आढळून आला
-आमदार सुरेश भोळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स येथे 180 मिलीच्या 149 व 750 मिलीच्या 9 अशा एकूण 158 बाटल्यांची
तफावत आढळून आली.
-बांभोरी येथील विनोद वाईन्समध्येही तीन दिवसाच्या नोंदी अपूर्ण व विदेशी मद्यसाठ्यात तफावत आढळली.
कारवाईकडे लागले लक्ष
तपासणी करण्यात आलेल्या सर्व सहा दुकानांमध्ये तफावत व रेकॉर्ड अद्ययावत नाही, त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने विसंगतीचे गुन्हे दाखल केले आहेत. लॉक डाऊन काळातच हा प्रकार घडल्याने आधीच्या क्रिश ट्रेडर्स व आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दुकानांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. दंडात्मक कारवाई, निलंबन व परवाना रद्द असे तीन पर्याय आहेत.