राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करणारः दळवी

0

कृषी पर्यटन करणार्‍या व्यावसायिकांची झाली विशेष सभा

पवनानगरः येथील पवना धरणग्रस्त कुटुंबातील तरूणांनी सुरू केलेल्या कृषी पर्यटनाला राजकीय मतभेद बाजुला ठेऊन सहकार्य करणार असल्याची ग्वाही माजी सभापती ज्ञानेश्‍वर दळवी यांनी दिली. पवना धरण परिसरातील कृषी पर्यटन करणार्‍या व्यावसायिकांची विशेष सभा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी तरुणांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मावळ अ‍ॅग्रो टुरिझमचे संस्थापक जेष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, सोनबा गोपाळे गुरुजी, गणेश धानिवले, संभाजी राक्षे, बबन कालेकर, मधुकर काळे, अनिल तुपे, दत्तात्रय ठाकर, यशवंत मोहोळ, सागर घाडगे यांच्यासह परिसरातील तरूण व्यावसायिक उपस्थित होते. पवना कृषी

पर्यटन केंद्र चालकांची विविध अडचणी सोडविण्यासाठी व व्यवसाय वाढविण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दळवी बोलत होते. पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. या भागात पवना धरण, लोहगड, तिकोना, तुंग, विसापूर आदी किल्ले व पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरणात वाहणारे धबधबे आदी परिसर पर्यटकांना मोहित करीत असतो. यामुळे पवना धरणात

विस्थापित झालेल्या धरणग्रस्त तरुणांनी आपापल्या जागेवर राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. यातुन मावळी संस्कृतीचे दर्शन शहरातील पर्यटकांना मिळत आहे. याभागात रोजगार मिळाला असुन यापुढील काळात यामध्ये सुधारणा झाल्यास अधिक संधी याठिकाणी उपलब्ध होईल.

अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
पवना कृषी पर्यटन केंद्र चालकांच्या बैठकीत बोलताना दळवी पुढे म्हणाले की, पवना धरण सुरु झाल्यापासून गेली 50 वर्षे हे धरणग्रस्त बांधव पुनर्वसनापासुन वंचित आहे. धरणासाठी संपादित केलेल्या परंतु जलसंपदा विभागाच्या उपयोगी न आलेल्या जागेवर तरूणांनी हे कृ षी पर्यटन सुरू केले आहे. उपजिवेकेसाठी तयार केलेल्या या उद्योगामुळे तरुणांचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे चालु आहे. त्यांना व्यवसाय अधिकृतपणे करण्यासाठी एकत्र येऊन अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. माऊली दाभाडे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. भविष्यात व्यावसायिक वाढविण्यासाठी कृषी पर्यटनाबरोबर परिसरातील गड किल्ले, मत्स्यव्यवसाय, याबरोबरच शेतीपूरक

व्यवसाय करण्यासाठी भरपूर संधी आहेत. या संधीचे सोने येथील तरुणांनी करावे व अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची घोषणा केली. सोनबा गोपाळे गुरुजी यांनी सांगितले की, तरुणांनी पर्यटन संबंधी प्रशिक्षण घेऊन चांगल्या दर्जाची सेवा दिली पाहिजे. गुणवत्तेत स्पर्धा करावी. सर्वांनी एकत्र येऊन दिशा ठरवून काम केल्यास यातुन उज्वल भविष्य घडविण्याची ताकद या व्यवसायात नक्कीच आहे. यात कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास व्यवसाय अधिक क्षमतेने वाढेल. रुडसेट संस्थेच्या माध्यमातून सर्व कृषी पर्यटन चालकांना कौशल्य विकास उपक्रमातून मोफत प्रशिक्षण देऊन आर्थिक सहकार्य करण्यासाठी मदत करणार. या बैठकीसाठी रवी ठाकर, दीपक कदम, विशाल ठाक र, रोहीदास ठाकर, अरविंद रोकडे, प्रकाश ठाकर यांनी विशेष प्रयत्न केले. आभार गणेश धानिवले यांनी मानले.