राजकीय महामुकाबल्याची धुळेकरांमध्ये उत्सुकता

0

धुळे । वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर हल्लाबोल करणारे आ.अनिल गोटे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे हे आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्यांच्या या महामुकाबल्याची धुळेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शहरातील चौका-चौकात गल्ली बोळात गेल्या 48 तासांपासून एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे, आ. अनिल गोटे आणि मनोज मोरे यांच्यात उद्या खरोखरच महामुकाबला होईल का? पत्रक युध्दाचा शेवट सुखद होईल का? असे काहीसे प्रश्‍न विचारले जात आहेत.

पोलिसांची भूमिका काय?
आ. गोटे व मनोज मोरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पत्रकयुद्ध सुरु आहे. एकमेकांना चॅलेंज केले जात होते. त्यातच दोघांनी आमने- सामने मुकाबल्याचा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे कोणीही माघार न घेता महामुकाबल्यासाठी तयार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आ.अनिल गोटे यांना तेलगीसह मोपलवार, मांगले,प्रकरणावरुन मनोज मोरेंनी लक्ष्य केले होते. तर आ.अनिल गोटे यांनी गुड्ड्या हत्याकांडासह धुळ्यातील तरुणांच्या खुनांवरुन राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे आता महामुकाबला होणार असेच बोलले जात आहे. आ.अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेसाठी नगांवबारी जवळील केशरानंद गार्डनची जागा निश्‍चित केली आहे. तर मनोज मोरे यांनी पत्रकार परिषद ही महाराणा प्रताप पुतळा, जे.बी.रोड किंवा बांबु गल्ली याठिकाणी व्हावी असे म्हटले आहे.मात्र तुमचे केशरानंद गार्डन फायनल असेल माझी हरकत नाही असेही मनोज मोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता महामुकाबला होईल का? याची प्रचंड उत्सुकता धुळेकर जनतेला लागून आहे. कायदा सुव्यस्था राखणारे प्रशासन या पत्रकार परिषदेला अटकाव घालेल का? किंवा पत्रकार परिषद स्थळी मोठा पोलीस फौजफाटा उभा करेल,याकडे देखील जनतेचे लक्ष लागून आहे.