दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत आमदार सतिष पाटील यांचा आरोप
एरंडोल-राजकीय द्वेषभावनेतून एरंडोल तालुक्यास दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळण्यात आले असून खालच्या दर्जाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप आमदार सतिष पाटील यांनी केला. एरंडोल तालुका तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करून आमरण उपोषण करण्यात येईल, तसेच तहसीलदार कार्यालयावर शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ.सतीश पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन दिले.
पावसाअभावी उत्पादना घट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,की जिह्यात सर्वत्र कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ पडला असून शेतका-यांसमोर आर्थिक संकट उभे राहीले आहे पावसाअभावी कृषिमालाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलपातळी अत्यंत खोल गेली असून अंजनी प्रकल्पात देखील शून्य टक्के जलसाठा आहे. तसेच भालगावसह अन्य प्रकल्पदेखील कोरडेठाक पडले आहेत. शासनाने जिल्ह्यातील बारा तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून एरंडोल, पारोळा व धरणगांव या तालुक्यांना केवळ राजकीय द्वेषभावनेतून वगळण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, शहराध्यक्ष बबलू चौधरी, विधानसभाक्षेत्र प्रमुख पराग पवार,युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, उपनगराध्यक्ष शकूर मोमीन,जितेंद्र चौधरी,आर. डी. पाटील, डॉ. प्रशांत पाटील, रोहिदास पाटील, अहमद सय्यद, रामधन पाटील, दीपक अहिरे, प्रवीण पाटील, उमेश देसले, पांडुरंग बाविस्कर, डॉ.राजेंद्र देसले, नगरसेवक अभिजित पाटील, राजेंद्र शिंदे, सुनील बडगुजर, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील, दशरथ चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.