भज्यांवर भारी भुतकाळाचे ओझे …!

0

जळगाव । जिल्ह्याच्या राजकारणात दोन ध्रुव समजले जाणारे आ. एकनाथराव खडसे आणि माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या एकमेकांना भजी भरवण्याच्या कृत्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे हे दोन्ही बलाढ्य नेते अडचणीच्या काळात एकमेकांबाबतची कटुता सोडून मैत्रीचा हात पुढे करतील असा काहींना आशावाद वाटत असला तरी इतिहासातील संदर्भ आणि वर्तमानकालीन परिस्थिती तपासून पाहिली असता असे होण्याची शक्यता धुसर असल्याचे दिसून येत आहे.

सहा वर्षांचे वर्तुळ  
नाथाभाऊ आणि सुरेशदादा हे आधी 19 ऑगस्ट 2011 रोजी मेहरूण तलावाच्या परिसरात जागतिक छायाचित्रण दिनाच्या कार्यक्रमात जाहीररित्या एकत्र भेटले होते. यात त्यांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर एकमेकांची छायाचित्रेही काढली होती. या घटनेला जवळपास सहा वर्षे होत असतांना याच मेहरूण तलावाच्या काठावर ‘मराठी प्रतिष्ठान’च्या ‘भजी महोत्सवा’त हे दोन्ही मातब्बर पुन्हा भेटले. यावेळेस उपस्थितांच्या आग्रहाखातर त्यांनी एकमेकांना भजी भरवली. आणि थोड्याफार गप्पादेखील केल्या. या सहा वर्षांमध्ये दोन्ही मान्यवरांच्या वैयक्तीक तसेच राजकीय जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे.

यातनापर्व
नाथाभाऊ आणि सुरेशदादा यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत अल्प कालखंड वगळता या दोन्ही नेत्यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. 2010च्या अखेरीस झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाथाभाऊंचे पुत्र निखील खडसे यांच्याविरूध्द सुरेशदादांनी मनीष जैन यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्यानंतर पडलेल्या ठिणगीने पुढे वणव्याचे स्वरूप धारण केले. या सर्व प्रकरणाला निमित्तमात्र असणारे मनीष जैन आज राजकीय विजनवासात असले तरी भाऊ आणि दादांमध्ये राजकीय सूडचक्र सुरू झाले. याची दोघांना जबर किंमतही मोजावी लागली. खडसेंनी पुत्र गमावला तर जैन यांना कारागृहवारी घडली. आज भाऊ हे मंत्रीमंडळातील पुनरागमनासाठी तर दादा हे राजकीय वर्तुळात पुन्हा वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहेत. एका अर्थाने हे दोन्ही तुल्यबळ नेते निर्णायक वळणावर असल्यामुळे एकत्र येणार का? याबाबत ‘भजी’गिरीमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली असली तरी ही बाब धुसर अशीच असल्याचे स्पष्ट आहे.

राजकीय सौजन्य
राजकीय क्षेत्रातील मातब्बर नेत्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत एकेमेकांवर वेळ आल्यानंतर तुटून पडत असतात. तथापि, वैयक्तीक आयुष्यात राजकीय विचारांच्या पलीकडे संबंध जोपासल्याने अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेतच. वैयक्तीक आयुष्यात वैचारीक लढाईच्या पलीकडे राजशिष्टाचाराला महत्व असते. यातच 2011 सालची घटना उपस्थित छायाचित्रकारांच्या आग्रहाखातर तर भजी महोत्सवातील सलोखा हा उपस्थित मान्यवरांच्या मांदियाळीमुळेच शक्य झाल्याची बाब विसरता कामा नये. याआधी भाऊंच्या उद्यानाच्या उदघाटनात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची जरादेखील दखल घेतली नसतांना येथूनच जवळ असणार्‍या मेहरूण तलावावर दोन्ही नेत्यांची कळी खुलली ती रिलॅक्स वातावरणामुळेच !

आधीही खूप प्रयत्न
भाऊ आणि दादांच्या दिलजमाईसाठी आधीदेखील खूप प्रयत्न झालेत. यात अनेक मान्यवरांनी मध्यस्थीचे प्रयत्न केलेत. अगदी जैन हे तुरूंगात असतांना त्यांचे बंधू रमेशदादा यांनीही खडसे यांना ‘झाले गेले विसरून जा’ असे सांगत नव्याने सुरूवात करण्याचे साकडे घातले होते. मात्र याचा उपयोग झाला नाही. आता तर वैमनस्याचा हा अध्याय खूपच पुढे निघून गेला आहे. खडसेंच्या मंत्रीमंडळातील राजीनाम्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी जैन यांच्या गटाला दिलेले पाठबळ कुणापासून लपून राहिलेले नाही. हा भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा परिपाक आहे. तर दुसरीकडे नाथाभाऊंचे कट्टर राजकीय शत्रू ना. गुलाबराव पाटील हेदेखील सुरेशदादांच्या सोबत असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे जिल्ह्यातील खडसे विरोधकांचा गट हा जैन यांच्या बाजूने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने उभा असल्याचे आजचे चित्र आहे. या दोन्ही गटांमधील अस्तित्वाची लढाई महापालिका आणि त्यानंतर अर्थातच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत होणार असल्याने दादा-भाऊंचे एकत्रीकरण आज तरी अशक्यप्राय वाटत आहे.

पूरक परस्परविरोध
ऐशीच्या दशकात जिल्ह्याच्या राजकारणात धुमकेतूसमान उदयास आलेला सुरेशदादा जैन यांनी मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन, प्रल्हादराव पाटील, प्रतिभाताई पाटील यांचे राजकारण पध्दतशीरपणे संपविले. मात्र नव्वदच्या प्रारंभी याच्यापेक्षाही जोरात राजकारणात एंट्री करणार्‍या खडसे यांना नेस्तनाबूद करणे हे जैन यांना कधीही शक्य झाले नाही ही तितकीच खरी बाब आहे. 2006 साली भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत चौधरी बंधूंना आव्हान देण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र झाले. यानंतर काही वर्षे त्यांच्यात सलोखा राहिला तरी सुप्त वा स्पष्टपणे एकमेकांना विरोध कायम राहिला. किंबहुना जैन यांचा विरोध हे खडसेंचे तर खडसेंना विरोध हे जैन यांचे राजकीय बलस्थान असल्याचे आपण अनुभवले आहे. एका अर्थाने एकमेकांना राजकीय आखाड्यात घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी परपस्परविरोध आवश्यक असल्याची बाब हे दोन्ही नेते जाणून आहेत. याचमुळे खडसे हे जैनांविषयी आणि भाऊ हे दादांविषयी काय बोलतात ? काय पवित्रा घेतात ? याची सर्वांना उत्सुकता असते. यामुळे राजकीय सौजन्याखातर कुणी थोडेफार सौख्य दाखवले तर लागलीच चर्चा होते. तथापि, आगामी कालखंडात हे दोन्ही नेते स्वत: अथवा आपल्या समर्थकांच्या माध्यमातून एकमेकांना जेरीस आणण्यासाठी मागेपुढे नक्कीच पाहणार नाहीत. मग चर्चा कितीही होवोत !