राजकीय संन्यास घेणार नाही : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील 

0
 मुंबई:यापुढे कोणतीही लोकसभा, विधानसभा किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार नाही,अशी घोषणा करून चोवीस तासही उलटले नाही तोच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी घुमजाव केलं आहे. ‘राजकीय संन्यास घेणार नाही’, असं स्पष्ट करतानाच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा खुलासाही पाटील यांनी केला.

कोल्हापुरात गुरुवारी जिल्हा पोलिस दलातर्फे गणराया अॅवॉर्ड वितरण समारंभ पार पडला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्या संदर्भातील बातम्या छापून आल्यानंतर पाटील यांनी हा खुलासा केला. ‘कोल्हापुरात गेल्यावर्षी मी डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापुरात डॉल्बी लागला नव्हता. त्याचा उल्लेख करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांनी गणेश मंडळांचा विरोध पत्करल्यानं मंडळांमध्ये नाराजी आहे, असं कालच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही. माझी काही सामाजिक भूमिका आहे, त्यामुळेच मी विरोध केला, असं मी या भाषणात बोललो. निवडणूक लढवायची नाही, हे वाक्य वेगळ्या संदर्भानं आलं होतं. मात्र त्याचा विपरीत अर्थ काढण्यात आला,असं पाटील यांनी सांगितलं.