घरात नृत्यकलेचा कोणताही वारसा नसताना दाखवली चमक
राजगुरूनगर : तिचे वय साडेदहा वर्ष. ती स्टेजवर येते अन् संगीताच्या तालावर नृत्यकला सादर करून उपस्थितांची मने जिंकते. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या विविध नृत्य स्पर्धांमध्ये तिने गेल्या पाच वर्षांच्या काळात 70 पेक्षा जास्त बक्षिसे मिळविली आहेत. घरात नृत्यकलेचा कोणताही वारसा नसताना तिने आपल्या कलेच्या जोरावर बालवयातच नाव कमावले आहे. राजगुरूनगर येथील ईश्वरी अशोक थिगळे, या बाल नृत्य कलाकाराची ही यशोगाथा.
वयाच्या पाचव्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात
ईश्वरीची आई प्राथमिक शिक्षिका आहे. तर वडील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात प्राध्यापक. थिगळे कुटुंबात दोन्ही मुली, ऐश्वर्या आणि ईश्वरी. ईश्वरी त्यातली लहान. घरात शैक्षणिक वातावरण असतानाही ईश्वरीच्या आई-वडिलांनी तिला नृत्यकला शिक्षणास प्रोत्साहन दिले. वयाच्या पाचव्या वर्षीच नृत्याची तिची आवड ओळखून त्यांनी ईश्वरीला उन्हाळी वर्गातील नृत्य प्रशिक्षणास दाखल केले. कमी वय असल्यामुळे सुरुवातीला तिला प्रवेश नाकारला. परंतु, पालकांच्या आग्रहाने प्रवेश देण्यात आला. तिच्या नृत्याच्या कारकिर्दीस तिथेच सुरुवात झाली. त्यानंतर तिची जिद्द, चिकाटी, आवड व परिश्रम यांच्या जोरावर तिचे संगीताच्या तालावर थिरकलेले पाऊल कधीच मागे हटले नाही.
उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून गौरव
अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळविले आहेत. घरातील दर्शनी भागात ठेवलेल्या ट्रॉफी तिच्या यशाची साक्ष देतात. या वर्षीच्या शरद महोत्सव शालेय स्पर्धेत राजगुरुनगरच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने ती सहभागी झाली. जिल्हास्तरावर तिला उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून गौरविण्यात आले. ईश्वरी तिला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतील काही रक्कम समाजकार्यासाठी खर्च करते. तिने तिचा वाढदिवस पांगरी येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा केला. तेथील मुलांना जेवण दिले. शालेय साहित्यही वाटप केले. रक्षाबंधन सणदेखील तिने अनाथ मुलांसोबत साजरा केला.
अभ्यासातही हुशार आहे ईश्वरी
ईश्वरीला आतापर्यंत सिनेकलाकार प्राजक्ता माळी, मानसी नाईक, केतकी माटेगावकर, मेघना घाडगे, अमृता खानविलकर, श्वेता शिंदे, तेजा देवकर, भार्गवी चिरमुले, आदर्श शिंदे, भाऊ कदम, नीलेश साबळे, कुशल बद्रिके आदींना भेटण्याची व त्यांच्यासोबत नृत्य करण्याची संधी मिळाली. ईश्वरी नृत्यकलेत पारंगत आहे तशी शालेय अभ्यासातही हुशार आहे. तिला मार्गदर्शक जतीन पांडे, नेहा नांगरे (कथ्थक), अमित कांबळे, सायली भन्साळी, अमित (झंकार), ईशा राणा (भरतनाट्ट्यम्), बाबू वाळुंज, आनंद खुडे यांचे सहकार्य मिळते. ईश्वरीच्या यशाने तिचे कुटुंबीय अतिशय खूश आहेत.