राजगुरुनगर :- हुतात्मा राजगुरु ,भगतसिंग व सुखदेव यांच्या सत्त्याऐंशीव्या बलिदान स्मरण दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून खेड तालुक्यातील विविध व्यक्ती संस्था व संघटनांनी या तीनही महान शहीदांना मानवंदना दिली. राजगुरुनगर शहरात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मस्थळी संपन्न समारंभासाठी खेड, आंबेगाव व जुन्नर तसेच पिंपरी चिंचवड,चाकण, पुणे शहर व मुंबईसह देशाच्या विविध राज्यांतून व भागांतून अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार, विक्रांत सिंह ’स्वच्छ भारत मिशन’, बिहार, श्वेता डारिया हरियाणा, शहादत ग्रुप, सात्यकी सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वंशज, सत्यशील राजगुरु व राजगुरुंचे वंशज कुटुंबिय यांचेसह राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रातिनिधिक देशप्रेमींचाही समावेश होता. तसेच तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ भारत चे आवाहन
दरम्यान,सकाळी 10 वाजता प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. यानंतर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना ’स्वच्छ भारत…स्वच्छ राजगुरुनगर ’ या अभियानात सामील करून घेत शहीदांना आगळीवेगळी मानवंदना देणार्या विक्रांत सिंह यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यात सहकार्य करावे असे आवाहन केले. विशेष उपस्थिती म्हणून तुफान लोकप्रियता मिळविलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बालकलाकार दिवेश मेदगे याने याच मातीत आपण जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटतो. तसेच जगावं तर शिवाजी महाराजांसारखं, लढावं तर शंभूराजांसारखं,आणि मरावं तर राजगुरुंसारखं.असे भावोद्गार काढले.
साहित्य संम्मेलनाचे आयोजन
दुपारी हुतात्मा राजगुरु साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. त्यानंतर गजल मुशायरा व कविता वाचनासह नाटिका व कठपुतली नावाचे मूक महानाट्य आणि परिसंवाद आयोजित केला गेला. नाटिकेमध्ये वडवानल कल्चर ग्रुप पुणे आणि नाट्यकर्मी ग्रुप मुंबई यांनी उपस्थितांचा मोठाच प्रतिसाद मिळवला. ’क्रांतिकारक आणि आजची परिस्थिती ’ या विषयावर डॉ. परिक्षित शेवडे यांनी उदबोधक सुसंवाद साधला. राजगुरुनगर वासियांना साहित्याच्या प्रांतातील अनेक साहित्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
शहिदांना आदरांजली
सायंकाळी बरोबर सात वाजून तेहतीस मिनिटांनी भोंगा(सायरन) वाजवता क्षणी संपूर्ण राजगुरुनगर शहरात, घरोघरी, रस्त्यांवर, दुकानात जिथे जिथे लोक असतील तिथे तिथे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्व नागरिक व महिलांनी देखील शहीदांना आदरांजली अर्पण केली. राजगुरुंच्या जन्मस्थळावर भीमा नदीच्या बाजूने असणार्या कठड्यावर शेकडो दिवे व मेणबत्त्या पेटविण्यात आल्या.हुतात्मा राजगुरु यांच्या बलिदान दिनानिमित कार्यक्रमांचेआयोजन करण्यासाठी हुतात्मा राजगुरु स्मारक समिती, नगरपरिषद राजगुरुनगर, जाणीव, वडवानल पुणे, नाट्यकर्मी मुंबई, क्रांती बिहार, शहादत ग्रुप हरियाणा यांच्यासह सहकार्य करणार्या सर्व व्यक्ती, संस्था व संघटना यांचे अध्यक्ष अतुल देशमुख, सचिव सुशिल मांजरे व नगराध्यक्ष शिवाजीराव मांदळे यांनी आभार मानले.