राजगुरूनगर सहकारी बँकेत 81 लाखाचा अपहार

0

चाकण पोलिस ठाण्यात रोखपालावर गुन्हा दाखल

चाकण : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे इंगळे शाखेत रोखपालाने बँकेच्या व खातेदारांच्या 81 लाख 34 हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी रोखपाल राहुल बोरा याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांपासून सुरु असलेला अपहार संचालकांच्या उशिरा लक्षात आल्याने बँकेचे धाबे दणाणले आहेत, त्यामुळे ठेवीदार व सभासदांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. हा प्रकार उशिरा समजल्याने संचालकांचा कर्मचार्‍यांवर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

जून 2016 ते जानेवारी 2017 मधील प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या महाळुंगे शाखेतील रोखपालाने हा अपहरणाचा प्रकार 15 जून 2016 ते 5 जानेवारी 2017 दरम्यान केला. याप्रकरणी राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे शाखेतील रोखपाल राहुल विलासचंद्र बोरा याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील साडे सहा महिन्याच्या काळात रोखपाल राहुल बोरा याने महाळुंगे शाखेत नोकरी करताना दैनंदिन कामकाजात ग्राहक सेवेसाठी दैनंदिन कामकाजासाठी स्ट्राँग रूममधून पैसे काढणे, ए टी एम मध्ये पैसे भरणे, त्याचा तपशील ठेवणे व दिवस अखेरीस शिल्लक रक्कम स्ट्राँग रूममध्ये जमा करणे अशा प्रकारचे काम करताना 81 लाख 41 हजार 943 रुपये 96 पैसे इतक्या मोठ्या रकमेचा अपहार केला.

एटीएम, कॅश कस्टडीमध्ये केला घोळ
एटीएम मध्ये पैसे भरल्यानंतर 43 लाख 95 हजार 200 इतकी रक्कम शिल्लक असणे आवश्यक असताना मोजणीनंतर ती रक्कम 1 लाख 59 हजार 200 रुपये इतकी आढळून आली. तसेच बँकेच्या कॅश कस्टडी मध्ये नाणेवारी प्रिंटनुसार 51 लाख 21 हजार 103 रुपये 96 पैसे इतकी रक्कम भरणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात मोजणी करताना ही रक्कम 12 लाख 15 हजार 160 रुपये इतकी मिळून आली. या रोख रकमेचा बँकेची व जनतेच्या पैशाचा अपहार करून फसवणूक केली आहे. बँकेचे अधिकारी किशोर ज्ञानेश्‍वर आदक वय 57, रा. राजगुरूनगर, जि. पुणे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.