राजगुरू महाविद्यालयात पाच तुकड्यांना मान्यता

0

प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या चार तर विज्ञान शाखेची एक तुकडी

राजगुरूनगर : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी चार आणि प्रथम वर्ष विज्ञान शाखेसाठीच्या एका अतिरिक्त तुकडीला राज्य शासनाकडून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली आहे, अशी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर यांनी दिली.

पाठपुराव्याला यश
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वाढलेले प्रमाण, त्यांचा वाणिज्य शाखेकडे असलेला ओढा आणि मर्यादित जागा यामुळे अनेक विद्यार्थी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून या अतिरिक्त तुकड्यांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली आहे.