नवी दिल्ली । राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. मिसा भारती यांचे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटण्ट) राजेश अग्रवाल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
लालू यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी हजारो कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप भाजपचे बिहारमधील नेते सुशीलकुमार मोदी यांनी मागील आठवड्यात केला होता. या आरोपानंतर आयकर विभागाने दिल्ली आणि गुरूग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी निगडीत विविध ठिकाणे आणि कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते.
1 हजार कोटी रूपयांच्या बेनामी संपत्तीच्या व्यवहाराच्या आरोपावरून हे छापे मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या छाप्यांनंतर आता मिसा भारती यांच्या सनदी लेखापालाला अटक करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल यांना दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर करण्यात आलेे. दोन दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांना आव्हान दिले होते. भाजप आणि संघाच्या नेत्यांनो मी तुम्हाला दिल्लीतील खुर्चीवरून खाली खेचेन, यासाठी भले मला माझी स्थिती काहीही होवो. त्यानंतर आता मिसा यादव यांच्या सीएला अटक करण्यात आली आहे.