‘राजधानी’चा जळगाव थांबा खर्चिक

0

भुसावळ जंक्शनला बायपास ; लोकोपायलटची ने-आण करण्यासाठी महिन्याला 30 हजार रुपये खर्च ; भुसावळ स्थानकावर थांबा दिल्यास विभागातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय थांबणार

भुसावळ (गणेश वाघ) : मुंबईहून थेट दिल्ली जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने राजधानी एक्स्प्रेस सुरू केल्याने भुसावळ विभागातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असलेतरी भुसावळ जंक्शनला बायपास करीत ही गाडी धावत असल्याने विभागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना पुन्हा भाडे खर्च करून जळगाव गाठावे लागत आहे तर दुसरीकडे मुंबईहून निघालेल्या या गाडीच्या चालकांची जळगावात अदला-बदल होत असून चालकांना नेण्यासाठी दरमहा 30 ते 35 हजार रुपये महिन्याने वाहन लावण्यात आल्याने जळगावातील थांबा हा खर्चिक ठरत असल्याची भावना सुज्ञ प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. जळगावप्रमाणेच भुसावळात या गाडीला थांबा दिल्यास दरवर्षी सुमारे रेल्वेचे साडेतीन लाखांपर्यंत नुकसान टळून रेल्वे प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

जळगावातील थांबा रेल्वेसाठी खर्चिक
जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांच्या रेट्यानंतर लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी आपले वजन वापरल्यानंतर 19 जानेवारीपासून ही गाडी सुरू करण्यात आली तर आठवड्यातून शनिवार व बुधवारी धावणार्‍या वातानुकूलित राजधानी एक्स्प्रेसमुळे थेट दिल्ली जाण्याची प्रवाशांची सोय झाली आहे मात्र रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ शहराला बायपास करीत नाशिकनंतर थेट जळगावात थांबा देण्यात आल्यानंतर भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे मुंबईहून आलेल्या लोकोपायलट (रेल्वे ड्रायव्हर) ची जळगावात ड्युटी संपल्यानंतर भुसावळातून आलेला लोकोपायलट गाडी पुढील प्रवासासाठी नेतो तर भुसावळातून चालकाला जळगाव नेण्यासाठी व जळगावात उतरलेल्या चालकाला भुसावळ नेण्यासाठी एका स्वतंत्र चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यापोटी रेल्वेला दरमहा 30 ते 35 हजार रुपये खर्च करावे लागत आहे. वर्षाचा विचार केल्यास ही रक्कम सुमारे साडेतीन लाखांवर पोहोचत आहे.

आठवड्यातून दोन वेळा धावतेय राजधानी
डाऊन 22221 मुंबई-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक बुधवार आणि शनिवारी धावत असून या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, बिना, झाशी, आग्रा कॅन्ट, पळवल या स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे तर अप 22222 निजामुद्दीनहून मुंबई सीएसटी राजधानी एक्स्प्रेस दर गुरुवारी व रविवारी धावत असून या गाडीला आग्रा कॅन्ट, झाशी, भोपाळ, जळगाव, नाशिकरोड, कल्याण येथे थांबा देण्यात आला आहे.

तर भुसावळात विभागातील प्रवाशांची गैरसोय टळणार
भुसावळ जंक्शनवर राजधानीला थांबा दिल्यास येथूनच चालकांना ड्युटी बदलली जावू शकतो व वर्षाकाठी होणारा सुमारे साडेतीन ते चार लाखांचा भूर्दंड वाचू शकतो व भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना जळगाव येथे जाण्यासाठी लागणार्‍या वेळेसह आर्थिक खर्चातही बचत होवू शकते. रेल्वे बोर्डाने या बाबीबाबत गांभीर्याने विचार केल्यास निश्‍चित प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.