नवी दिल्ली । राजधानी एक्स्प्रेस ही भारतातील प्रिमियम ट्रेन समजली जाते. सर्व सुखसोयींनी परिपूर्ण, स्वच्छ अशी या गाडीची ओळख आहे. मात्र, या गाडीत असलेल्या शेकडो प्रवाशांवर तब्बल 16 तास भुकेले, तहानलेले राहण्याचा विचित्र प्रसंग घडला. दिल्ली ते रांची राजधानी एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. या एक्स्प्रेस ट्रेनचा पॅन्ट्री स्टाफ स्टेशनवर अचानक उतरून गेल्याने ही विचित्र परिस्थिती उद्भवली.
रात्री दिल्लीवरून रांचीसाठी ट्रेन निघाली. या ट्रेनमध्ये अनेक तास झाले तरी कोच अटेंडंटचा किंवा किचन स्टाफचा पत्ता नसल्याने या ट्रेनच्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रवाशांना खायला काही नव्हतेच शिवाय प्यायला पाणी देखील नव्हते. ट्रेन सुरू होऊन अनेक तास झाले तरी कोणाचा पत्ता नसल्याने शेवटी प्रवाशांनी आपला मोर्चा एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारकडे वळवला आणि जे हातात मिळेल ते खायला प्रवाशांनी सुरुवात केली. मात्र, ते ही अन्न पुरेसे नसल्याने अनेकांची गैरसोय झाली. शेवटी प्रवाशांनी येणार्या अनेक स्टेशनवर उतरत जमेल तसे खाण्यापिण्याचे पदार्थ विकत घेतले.
अवघे 17 अटेंडंट
एरव्ही राजधानी एक्स्प्रेसच्या एका डब्यामध्ये दोन कोच अटेंडंट असतात. रांची राजधानीमध्ये 17 डबे आहेत. त्यामुळे 34 कोच अटेंडंट असणे आवश्यक होते. पण, प्रत्यक्षात 17 जणांनीच ड्युटीसाठी रिपोर्टींग केले होते. ही ट्रेन रांचीला पोहोचल्यावर प्रवाशांच्या रागाचा तडाखा आग्नेय रेल्वेच्या अधिकार्यांना बसला. झाला प्रकार ऐकून तेही हबकले. या ट्रेनमधल्या केटरिंगची जबाबदारी उत्तर रेल्वेकडे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांनी वरिष्ठ अधिकार्यांकडेही विचारणा केली. झाला प्रकार अतिशय भयंकर असून पुढे असे होणार नसल्याची ग्वाही या अधिकार्यांनी दिली. या सार्या प्रकाराबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या एक्स्प्रेसला केटरिंग सर्व्हिस पुरवणार्या किचन्सवर छापे टाकले.