राजधानी एक्स्प्रेस सुसाट!

0

नवी दिल्ली । मुंबई ते दिल्ली हे अंतर 17 तासांवरुन 12 तासांवर येणार आहे. कारण आता पुढील महिन्यात भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. राजधानी एक्स्प्रेसचा वेग 30 टक्क्यांनी वाढणार असल्याने मुंबई-दिल्ली दरम्यान प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. मुंबई-दिल्ली प्रवासासोबतच दिल्ली-हावडा प्रवासासाठी लागणारा वेळदेखील 17 तासांवरुन 12 तासांवर येणार आहे.

मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या दोन्ही मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून ताशी 200 किलोमीटर इतका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे मार्ग देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मार्ग होणार आहेत.

मालगाड्यांचा वेग सरासरी 22 किलोमीटर प्रतितास
सध्या दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणारी गतिमान एक्स्प्रेस ताशी 160 किलोमीटर वेगाने धावते. भारतीय रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग 100 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ‘राजधानी एक्स्प्रेसचा वेग 75 किलोमीटर प्रतितास इतका आहे. तर इतर लांब पल्ल्यांच्या गाड्या साधारणत: 52 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. देशाती मालगाड्यांचा वेग सरासरी 22 किलोमीटर प्रतितास आहे,’ अशी माहिती रेल्वेतील एका अधिकार्‍याने दिली.

18 हजार 163 कोटी रुपयांचा खर्च येणार
सध्याच्या घडीला जवळपास 5 लाख कोटींचे 394 प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा वेगदेखील मंदावला आहे. ‘रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याच्या कामाला जानेवारी 2018 पासून सुरुवात होईल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल,’ अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या प्रकल्पासाठी 18 हजार 163 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याअंतर्गत इलेक्ट्रिक यंत्रणेच्या सुसज्जतेवर भर देण्यात येईल. यासोबतच रेल्वे रुळांच्या शेजारी नवी कुंपणेदेखील उभारण्यात येतील.