राजनाथ सिंह ‘विनोद तावडेंना एकदा गाडीत बसवा’; मनसेकडून राजनाथ सिंहाना खोचक पत्र !

0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात भाजपा विरोधात प्रचार करत आहे. राज ठाकरे भाजप नेत्यांवर पुराव्या सकट आरोप करत आहेत. यावरून भाजप आणि राज ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान नवी मुंबईतील मनसेच्या अध्यक्षांनी चक्क राजनाथसिंह यांना एक खोचक पत्र लिहून विनोद तावडेंना एकदा तुमच्या गाडीत बसू देण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. विनोद तावडेंची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इचलकरंजी येथील सभेत बोलताना, तावडेंना विनोदी नेता असे संबोधले. तसेच, राजनाथसिंहांचा ड्रायव्हर ज्यांना आपल्या गाडीत बसू देत नाही, त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये, असेही संदीप देशपांडेंनी म्हटले. त्यानंतर, आज नवी मुंबईतील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. मनसेचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टूरिंग टॉकिजची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असा आरोप विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. तावडेंच्या या टीकेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तावडेंना लक्ष्य केले आहे.