डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास
सफाळे । आदिवासी पाड्यावर गेली आठ वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करताना नावीन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीणदृष्ट्या विकास करण्यासाठी धडपडणारे पालघर तालुक्यातील जि प. शाळा बोरीचापाडा या शाळेतील शिक्षक राजन गौतम गरुड यांना कोल्हापूर येथील नामांकित आविष्कार फाऊंडेशन या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्थेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. गरुड शैक्षणिक प्रगतीचा नवीन ध्यास घेऊन ब्लॉगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शालेयस्तरावर शिक्षकांना उपयुक्त ठरतील असे आपले वेगवेगळ्या विषयांचे विविध उपक्रम व लेखन करत आहेत. सर्रीीवीरक्षरप.लश्रेसीिेीं.लेा या शैक्षणिक संकेतस्थळाच्यास माध्यमातून शालेयस्तरावर शिक्षकांना उपयुक्त ठरतील असे विविध उपक्रम राबवले आहेत.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास करण्यासाठी नाट्य, संगीत, खेळ आणि विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरावर अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. शिक्षणाची वारी या राज्यस्तरीय उपक्रमात पुणे, नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी जाऊन फोनिक्स इंग्रजी हा उपक्रम सादर केला आहे.तसेच आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहज शिकता यावे यासाठी पहिली व दुसरी मराठी भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे वारली भाषेत भाषांतर करुन पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या ब्लॉगला अडीच ते तीन लाख शिक्षकांनी भेट दिली आहे.