नवी दिल्ली : हंगामा, भूलभुलैय्या, पार्टनर अशा चित्रपटांतून झळकलेला विनोदी अभिनेता राजपाल यादव याला न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या कडकडडुमा न्यायालयाने सोमवारी धनादेश न वठल्याच्या प्रकरणी सुनावणी देताना ही शिक्षा सुनावली. गेल्या शुक्रवारी राजपाल यादव, त्यांची पत्नी आणि एका कंपनीला एका कर्ज प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. 2010 मध्ये राजपाल आणि राधा यादव यांनी दिल्लीतील एम. जी. अग्रवाल या व्यावसायिकाकडून त्यांच्या अता पता लापता या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. राजपाल यादव यांचा हा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न होता. पण पैसे परत न करू शकल्यामुळे अग्रवाल यांनी राजपाल आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात पोलिस तक्रार केली होती.