राजपुतांसमोर निर्मात्यांची नांगी!

0

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. 1 डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. पद्मावतीला राजपूत संघटनांचा विरोध केला आहे. तसेच करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना धमकी दिली आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही दबावाखाली येत तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सेन्सॉरची चालढकल
चित्रपट प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केले. जोशी म्हणाले, कागदपत्रांमध्ये तो काल्पनिक चित्रपट आहे की ऐतिहासिक हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे जाणून घेण्यासाठी सेन्सॉरने भन्साळींकडे विचारणार केली आहे. परंतु, सेन्सॉरवरच चित्रपट प्रमाणित करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप लावला जात आहे. सेन्सॉरची नाराजी आणि राजपूत संघटनांचा विरोध पाहता अखेर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

आरापे बिनबुडाचे
ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये दीपिका राणी पद्मिनी, शाहिद कपूर महारावल रतन सिंह तर रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या कथानकावर करणी सेनेचा आक्षेप आहे. राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भन्साळी यांनी असे कोणतेही दृष्य चित्रीत न केल्याचे म्हटले आहे. जयपूर येथे या चित्रपटाच्या सेटवर करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रिकरणादरम्यान गोंधळ घातला होता. ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शनानंतर हा विरोध तीव्र झाला. मुळात आंदोलनकर्त्यांनीच हा चित्रपट अजून पाहिलेला नसून ऐकीव माहितीवर विरोध करण्यात येत आहे.

दीपिका, भन्साळींच्या सुरक्षेत वाढ
ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात, अशी धमकीच करणी सेनेचा राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा याने दीपिकाला दिली होती. या पार्श्‍वभूमीवर दीपिका, संजय लीला भन्साळी आणि रणवीर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मोदींच्या नावाखाली अनेकांची दुकाने
-शबाना आझमी यांची परखड टीका
-सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेविषयी प्रश्‍न
सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांसाठी पद्मावती चित्रपटाचा अर्ज निर्मात्यांकडे परत पाठवला की, निवडणुकींचा फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी विचारला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर परखड मत व्यक्त केले. मोदी सरकारच्या छत्रछायेखाली सर्वांची दुकाने सुरू आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीला पाठिंबा दर्शवत आझमी यांनी 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर म्हणजेच इफ्फीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन चित्रपटसृष्टीला केले. भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणला येत असलेल्या धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत इफ्फीवर बहिष्कार टाकावा, असे ट्विट त्यांनी केले.