राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्काराचे शनिवारी वितरण

0

धुळे । जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागीय आढावा बैठक येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात शनिवार 11 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. याच दिवशी दुपारी 4 वाजता विभागस्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा होईल. या पार्श्‍वभूमीवर संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाची विभागीय आढावा बैठक व राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पूर्व तयारीसाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जलसंधारण राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थिती लाभणार आहे. जलयुक्त शिवारच्या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., उपवनसंरक्षक जी. के. अनारसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, जि.मा.का.रणजितसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

अधिकारी राहणार उपस्थित
मृद व जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांच्यासह जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभागीय प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित असतील.

बक्षीस वितरण
जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्‍या पुरस्कारप्राप्त गावांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कायरे, तोरणमाळला, वडगाव पंगू, रवळगाव, धुळे जिल्ह्यातील चौगाव खुर्द, बोपखेल,सुळे,चौगाव बु., गोंदूर, नंदूरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, खडकी, धांद्रे, भालेर, सोनवद, जळगाव जिल्ह्यातील लोहारा, वाकडी, देऊळगाव, उमाळे, वढोदा तर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, गुंडेगाव, पळवे बु., कुमशेत,चिखली या गावांना बक्षीस मिळणार आहे. प्रथम क्रमांकाला 1 लाखाचे बक्षीस मिळणार आहे.

तालुकास्तरीय पुरस्कारात
चांदवड, मालेगाव, शिंदखेडा, अमळनेर, चाळीसगाव, जामखेड, कर्जत या तालुक्यांना गौरविण्यात येणार आहे. विभागीय स्तरावरुन गावांचा देखील पूरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांचा यात समावेश आहे. पत्रकारांनी जलयुक्तशिवाराच्या कामगिरीला चांगली प्रसिध्दी देण्याचे काम केल्याने त्यांचा हा सन्मान होणार आहे.