राजशिष्टाचार पाळला, तरच भोरमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडी

0

आमदार संग्राम थोपटे यांचा इशारा : भोंगवली गटात 4 कोटींची विकासकामे

भोर : लोकसभेला आघाडीचा धर्म यांना आठवतो आणि विधानसभेला हा धर्म कसा विसरला जातो? लोकसभेला दोन पंचवार्षिकमध्ये आम्ही आघाडी धर्म पाळला असताना 2014 च्या विधानसभेला यांना याचा विसर पडला. यंदाही तुमची जर तशीच तयारी असेल तर आमचीही माघार नाही. यापुढे कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन आणि कोणत्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळला गेला तरच भोरमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा विचार केला जाईल, असा इशारा आमदार संग्रम थोपटे यांनी दिला आहे.

भोंगवली गटातील इंगवली, केंजळ, काळेवाडी, किकवी, मोरवाडी, पाचलिंगे आदी गावात सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे उद्घाटन,भूमिपूजन आमदार थोपटे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोरेवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ धाडवे-पाटील, के. डी. सोनवणे, नाना सुके, शंकर धाडवे, सोमनाथ वचकल, मदन खुटवड, स्वाती मोरे, सुभाष मोरे, माऊली पांगारे, संजय थीटे आदींसह सरपंच, कार्यकर्ते, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

राजकारणाच्या शेकोटीची ऊब घेण्याचे थांबवा

भोर तालुक्यातील वीज, पाणी, राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्‍न सोडविण्याचे काम होत असताना सारोळा येथील पुलाची रुंदी अडीच मीटरची पाच मीटर करून घेतली. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना यांचा अध्यक्ष म्हणतो हे काम आमदारांचेच. राजकारणाच्या शेकोटीची ऊब घेण्याचे काम यांनी थांबवावे. वरवे, धांगवडी, सारोळा उड्डाणपुलाच्या कामावरून हे आमच्या नावाने ओरडतात. महामार्गावर मुंगी मेली तरी त्याला आमदारच जबाबदार! मग श्रेयवाद कशाला करता, श्रेयवादाचे नारळ कशाला फोडता, असा सवाल करून विरोधकांची यावेळी आमदार थोपटेंनी खिल्ली उडवली.

विकासकामांच्या खोट्या बातम्या

तालुक्यात विकासकामांच्या खोट्या बातम्या पसरवण्याचा सारिपाट सुरू आहे. आम्ही मंजूर केलेली कामे मीच केली, असा विरोधाभास पसरवण्याचे काम जिल्हा परिषदेचा एक पुढारी करीत आहे. भोंगवली-माहूर या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी लोकप्रतिनीधी म्हणून मंजूर केला असताना हे काम मीच केले असे कोणी म्हणत असेल तर त्याची जागा कार्यकर्त्यांनी त्याला दाखवली पाहिजे. राजशिष्टाचार तुमच्याकडे नसेल तर त्याची अपेक्षा आमच्याकडूनही करू नका, असा इशारा आमदार थोपटे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच मारुती मोरे, तर सुभाष मोरे यांनी आभार मानले.