जयपूर : राजस्थानातील आमदारांच्या बद्दल लोकांच्या मनात असणारा असंतोष पाहता १६० पैकी १०० आमदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा निर्णय भाजपच्याकार्यकारिणीने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नमो’ अॅपवरही संबंधित आमदारांविरोधात स्थानिकांनी प्रचंड टीका केली आहे.
राज्यातील वसुंधरा राजेंच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या पाच वर्षात फार काही चांगली कामगिरी केलेली नाही. लोकांच्या मनात भाजपच्या मंत्र्याबद्दल आणि आमदारांबद्दल प्रचंड रोष आहे. भाजपच्या निरीक्षकांनीही लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचं पक्ष कार्यकारिणीला सांगितलं आहे. तसंच आपल्या लोकप्रतिनिधींबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमो अॅप सुरू केलं होतं. या अॅपवरही राज्यातील ८० ते १०० आमदारांवर प्रचंड टीका केली आहे. त्यामुळे या १०० आमदारांना पुन्हा संधी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी
राज्यात भाजपला पुन्हा निवडून येण्यासाठी नव्या दमाचे आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देणं गरजेचं आहे. तेव्हा १०० आमदारांना पुन्हा तिकीट न देता त्यांच्याजागी तरूण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. भाजपने अॅट्रोसिटीबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे राजपूत समाजही त्यांना या निवडणुकीत मतदान करण्याची शक्यता कमीच आहे. राजस्थानाची निवडणूक एका महिन्यावर आली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन प्रचार करत आहेत. तेव्हा राजस्थानची सत्ता भाजप पुन्हा काबीज करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.