राजस्थानमध्ये रात्री २.३० वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद; १०९ आमदारांच्या पाठिंबा

0

जयपूर: उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काल रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने काँग्रेससह मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची डोकेदुखी वाढली आहे. राजस्थानमध्ये राजकीय क्षेत्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त करत रविवारी काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. दिल्लीत ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी ठाण मांडून आहे.