राजस्थान सत्तासंघर्ष: कॉंग्रेस आमदारांचे राजभवनातच धरणे

0

जयपूर: सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. सचिन पायलट यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली असली तरी कॉंग्रेसवरील धोका अद्याप टळलेला नाही. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल यांच्याकडे विधानसभेचे सत्र बोलविण्याची पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र ही मागणी राज्यपालांनी आज शुक्रवारी फेटाळली. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेस आमदारांसह राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आहे. राज्यपालांनी अद्याप अधिवेशन घेण्यास मंजुरी दिलेली नसल्याने कॉंग्रेस आमदारांनी राजभवनातच धरणे आंदोलन सुरु केले आहे.

राज्यपालांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि काही आमदार कोरोनाबाधित असल्याने विधानसभा अधिवेशन घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे दबावतंत्र म्हणून कॉंग्रेस आमदारांनी राजभवनात जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपालांकडे सत्र बोलविण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र ती मागणी राज्यपालांनी फेटाळली होती. यावर गेहलोत यांनी अतिशय तीव्र शब्दात भाजपवर आणि राज्यपालांवर टीका केली. राजस्थानच्या राजकारणात “नंगानाच” सुरु आहे अशी टीका गेहलोत यांनी केली आहे. राज्यपाल संविधानिक पदावर आहे, त्यांनी निपक्षपणे काम करणे अपेक्षित आहे. मात्र राज्यपाल तसे वागत नसल्याचे आरोप गेहलोत यांनी केले आहे.

कॉंग्रेसने आता राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि इतर नेत्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.