जळगाव। जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. या शेती सिंचनासाठी कार्यक्षम आणि शाश्वत उपाय पुरवणारी म्हणजेच संसाधने ते रोपांच्या मुळांपर्यंत पाण्याचा कार्यक्षम वापर करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. जैन इरिगेशनला राजस्थानची नुकतीच 189.02 कोटी रुपयांची एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. यानुसार कंपनीने पाण्याच्या पायाभूत सुविधा तयार करुन ते पाणी शेतकर्यांच्या शेतात पोहोचवणे आणि शेतकर्यांच्या शेताच्या बांधापर्यंत सूक्ष्म सिंचन सिस्टीम्स वापरुन ते पाणी पिकासाठी देणे सुलभ होणार आहे.
जैन इरिगेशनला या प्रकल्पाच्या अंतर्गत आखणी, पुरवठा, अंमलबजावणी, पाण्याच्या स्त्रोतापासून ते शेतजमीनींपर्यंत सूक्ष्म सिंचनासाठी पाईपांचे जाळे उभारून कार्यान्वित करणे या कामांचा समावेश असेल. इंदिरा गांधी नहार प्रोजेक्ट हा जगातील सर्वात विशाल प्रकल्पांपैकी एक गणला जातो. या कालव्यामुळे पडीक व वाळवंट क्षेत्रावर शेती करणे शक्य होत आहे. पाण्याची उपलब्धता होत असल्यामुळे वाळवंटातील बेकामी जमिनींचे सुपिक शेतजमिनींमध्ये रुपांतर होईल. दुष्काळापासून संरक्षण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पर्यावरणाचे संरक्षण, रोजगार निर्मिती, पुनर्वसन, पशूसंपत्तीचा विकास आणि पिकांचे उत्पादन वाढवणे हे पण या प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत. या ऑर्डरमुळे राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील सुमारे 15 हजारा हून अधिक शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक परिस्थितीत सकारात्मक परिवर्तन होणार आहे. 1 लाख 11 हजार एकर जमीनीला याचा फायदा होणार आहे. उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता 30 टक्केपासून 60 टक्यापर्यंत वाढणार आहे.