राजस्थान रॉयल्स नाव आता नको रे बाबा!

0

जयपुर । सुमारे दोन वर्षांच्या बंदीचा कालावधी संपल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करणार्‍या राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने बीसीसीआयकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहे. जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड असे अधिकृत नाव असलेल्या आयपीएलमधील या फ्रँचायझीने संघाचे नाव बदलणे आणि जयपूरहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित करण्याला परवानगी देण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. स्पॉटफिक्सिंग प्रकरणात घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपल्यामुळे आयपीएलच्या पुढील वर्षाच्य स्पर्धेत पुन्हा खेळणार आहे. जयपूरमधून आपला तळ हलवण्याचा निर्णय रॉयल्सच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. आयपीएलचे पदच्यत चेअरमन ललित मोदींवर कारवाई करण्यासाठी बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट संघटनेचे निलंबन केले होते.

किंग्जला मोहाली नकोसे
राजस्थान रॉयल्सप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाबनेही आपला तळ बदलण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. किंग्ज इलेव्हनने याआधीही स्थलांतर करण्याची मागणी केली होती. स्थानिक राज्य संघटनेकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. स्थानिक शासकीय यंत्रणा आवश्यक त्या परवानगी देण्यासाठी विलंब लावत असल्याचे कारण किंग्ज इलेव्हन पंजाबने दिले आहे. याशिवाय मोहालीत संघाचे फारसे पाठिराखे नसल्याचा उल्लेख त्यांनी बीसीसीआयला दिलेल्या पत्रात केला आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले की, रॉयल्सने संघाचे नाव बदलण्याची परवानगी मागितली आहे. पण त्यासाठी त्यांनी कोणतेही कारण सांगितलेले नाही. नऊ वर्षांपूर्वी पहिली आयपीएल स्पर्धा जिंकणार्‍या राजस्थान रॉयल्सचे नाव नंतरच्या काळात मॅच फिक्सिंग आणि स्पॉटफिक्सिंगमुळे बदनाम झाले होते.