जयपूर : आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी प्रवेश केला आहे. एका स्थानासाठी हैदराबाद, पंजाब, कोलकाता आणि राजस्थान यांच्यात चुरस आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानने चांगली कामगिरी करत प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवल्या. पण, त्यासाठीच्या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात राजस्थानचे नेतृत्व भारतीय खेळाडूच्या खांद्यावर असणार आहे. पुन्हा अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानला पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत ऑस्ट्रेलियाच्या स्मिथकडे सोपवण्यात आले. स्मिथने संघाला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आणले, परंतु आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य असलेल्या स्मिथला मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ पुन्हा अजिंक्य रहाणेच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानचा संघ 13 सामन्यांत 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मागील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बंगळुरूच्या आशा संपुष्टात आल्या, तर राजस्थानला अजूनही संधी आहे. स्मिथने 12 सामन्यांत 39.87च्या सरासरीनं 319 धावा केल्या आहेत. पण, आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी त्याला मायदेशी परतावे लागले आहे. रहाणेने 13 सामन्यांत 35.54च्या सरासरीने 391 धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचा समावेश आहे. राजस्थानला अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे.