राजस्थान सरकारच्या अडचणी वाढल्या; भाजपने उचलले मोठे पाऊल

0

जयपूर: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष संपूर्ण देश बघत आहे. कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत सरकार अडचणीत आले. सचिन पायलट यांना बंडाची किंमत चुकवावी लागली. त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. सचिन पायलट यांनी बंड केलेले असताना राजस्थानमधील सरकार भक्कम होते. आता सचिन पायलट हे परत कॉंग्रेसमध्ये दाखल झाले असल्याने सरकार अधिक भक्कम झाले आहे. मात्र उद्या शुक्रवारी राजस्थानच्या विधानसभेत भाजप गहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. भाजप नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली. त्यामुळे गहलोत सरकारसमोर आता बहुमत सिद्ध करून दाखवण्याच मोठे अव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान उद्याच्या बहुमत सिद्ध करण्याची तयारी म्हणून कॉंग्रेसने दोन आमदारांचे राजीनामे नामंजुर केले आहे. सचिन पायलट समर्थक आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आले आहे. अशोक गेहलोत यांच्या सरकार विरोधात कारवाई केल्याबद्दल दोन्ही आमदारांचे पक्षातील सदस्यत्त्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही आमदारांनी राजीनामा देखील दिला होता.

‘काँग्रेस पक्ष टाके लावून-लावून कपडे जोडू पाहत आहे. मात्र कपडा फाटून गेला आहे. हे सरकार लवकरच कोसळणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे. हे सरकार आपल्याच अंतर्विरोधामुळे पडणार असून काँग्रेस उगाचच भारतीय जनता पक्षावर आरोप करत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील घरातील भांडणाशी भारतीय जनता पक्षाचे काहीएक देणे-घेणे नसल्याचेही ते म्हणाले.