जयपूर: कर्नाटकनंतर, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार पडण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे. खुद्द राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याबाबत भाजपवर आरोप केले आहे. भाजप नेते सतीश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांच्याकडून केंद्रातील नेत्यांच्या मदतीने राजस्थानमधील सरकार पडण्याच्या हालचाली सुरु आहे.
भाजपकडून कॉंग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचे ऑफर देण्यात येत असून अॅडव्हान्समध्ये दहा कोटी देऊन सरकार पडल्यानंतर १५ कोटी देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री गेहलोत यांनी राजस्थानमधील सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून सरकार कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे हे प्रयत्न वाया जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्री गेहलोत करत आहे.
दरम्यान गेहलोत यांच्या या आरोपाचे भाजप नेते सतीश पुनिया यांनी खंडन केले आहे. मुख्यमंत्री गेहलोत आणि त्यांचे सरकार राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याचा आरोप ते करत आहेत. गेहलोत यांचे आरोप निराधार असून त्यांच्याकडे आवश्यक बहुमत आहे तर मग चिंता करण्याची काय आवश्यकता? असा सवालही उपस्थित केला आहे.