घाटकोपर (निलेश मोरे) । पोटात केसांचा गोळा हे ऐकून ऐकणार्यांच्या पोटात गोळा नाही आला तरच नवल. परंतु, हे सत्य आहे. तसं पाहता देश-विदेशात अन्य प्रकारच्या रुग्णावरील शस्त्रक्रियेबद्दल वाचले असेल किंवा पाहिलेदेखील असेल. मात्र, डोक्यातील केसांचा 750 ग्रॅमचा गोळा पोटात हे ऐकून खरेच पोटात गोळा येतो. आरती लोंढे (वय 20) या विवाहित युवतीच्या पोटातून राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांना केसांचा गोळा शस्त्रक्रियेतून बाहेर काढण्यात यश आले. डॉक्टर भरत कामत, डॉक्टर प्रशांत पाटील आणि डॉक्टर सौरभ यांच्या देखरेखीखाली गणेश चतुर्दशी अर्थात 2 सप्टेंबर रोजी ऑपरेशन करण्यात आले. सध्या या युवतीची प्रकृती स्थिर आहे.
नैराश्यातून केस गिळायची आरती
आरती लोंढे (वय 20) ही अंबरनाथ कावसाई रोड येथे राहते. गेल्या वर्षी तिचा विवाह झाला. पती कामधंदा न करता दारूच्या व्यसनात बुडाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने दोन वेळच्या जेवणाची गैरसोय होत असे. या रोजच्या जाचाला कंटाळून आरतीचे मानसिक संतुलन बिघडल्याने दोन वर्षांपासून चिडचिडा स्वभावातून आरती रागाने डोक्यातील एक एक केस उपटून तोंडात भरून गिळत असे, अशी माहिती पुढे येते.
एक-एक केस काढून काढला गोळा
दरम्यान युवतीवर शस्त्रक्रीया करणार्या डॉक्टर भरत कामत यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की पोटात केसांचा गोळा हि शस्रक्रिया पहिल्यांदाच पाहतो आहे. हि एक अजब बाब आहे. आरतीची आई जेव्हा तिला उपचारासाठी माझ्याकडे घेऊन आली त्यावेळी तिला जेवल्यानंतर लगेच उलट्या होत असल्याचे समोर येत होते. दहा ते बारा दिवसांपासून आरतीला उलट्याचा त्रास होत होता. सुरुवातीला हि केस खूप नॉर्मल वाटत होती, औषध देऊन रुग्ण ठिक होईल असे वाटत असताना आम्ही त्याआधी रुग्णला पोटाचे सिटीस्कॅन करायला सांगितले असता त्यामध्ये आम्हाला पोटाच्या जठरात एक गोळा तयार झाल्याचे दिसून आले. यादरम्यन आम्ही ऑपरेशन करायला घेतले असता पोटातील जठराला छेद देत त्यातील एक एक केस आम्ही बाहेर काढत त्यातील केसांची एक लांब शेपूट जठराच्या आतील टोकापर्यंत चिकटून होती यावेळी सावध पद्धतीने आम्ही एक एक केस बाहेर काढत जमा केला.