मुख्यमंत्र्यांची सूचना असल्यामुळे उपस्थिती
पक्षाची नाराजी नसल्याचे डॉ. सावंतांचे प्रतिक्रिया
मुंबई: सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची उपस्थिती असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दीपक सावंत यांनी सोमवारीच आपला राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांना थोडे थांबण्याचा सल्ला दिला होता. तसेच आजच्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्यमंत्री दीपक सावंत हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते.
हे देखील वाचा
जुलै महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेने आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना उमेदवारी न देता प्रभाग क्र.४ चे पदाधिकारी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या तिकिटावर डॉ.दिपक सावंत हे मागील दोन टर्म मुंबई पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर आमदार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याने त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डॉ.दिपक सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. राजीनामा दिल्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा उध्दव ठाकरे यांच्याकडे जरी सुपुर्द केलेला असला तरी तो माझ्या पर्यंत आलेला नाही. त्यामुळे तुम्ही मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची सुचना केली. त्यानुसार अखेर डॉ.दिपक सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठक सुरु झाल्यानंतर उशीराने का होईना सहभाग घेतला.
याबाबत आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांना विचारले असता ते म्हणाले कि, पक्षाने मला १८ वर्ष संधी दिली आहे. माझी आमदारकीची टर्म जुलै महिन्यात संपत आहे. आता विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली असून ते निश्चित विजयी होतील. तसेच पक्षाने मला तिकिट दिलेले नसल्याने मला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहीला नसल्याने मी मंत्रीपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुखांकडे सादर केला आहे. पक्षाची माझ्यावर कुठलीही नाराजी नव्हती, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.