राजीनाम्यासाठी धोनीवर दबाव!

0

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यानंतर, क्रिकेटचाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. धोनीने अचानक वन डे आणि टी ट्वेण्टीचं कर्णधारपद सोडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र धोनीने कर्णधारपद सोडले नाही तर त्याला पद सोडण्यासाठी दबाव आणला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धोनीने स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता आणि त्याला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले असा खळबळजनक आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी केला आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमिताभ चौधरी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील संबंध काही दिवसांपासून खराब झाले होते. त्यांनीच धोनीवर दबाव आणला असल्याची माहिती मिळाली आहे.

नागपूर भेटीतच झाला निर्णय
धोनी स्वत: कर्णधारपदावरुन पायउतार झाला नाही. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे गेल्या आठवड्यात नागपुरात धोनीला भेटले. त्यावेळी नागपुरात झारखंड आणि गुजरात यांच्यात रणजी सामना सुरु होता. धोनी झारखंडच्या टीमचा मार्गदर्शक म्हणू काम पाहात होता. त्यादरम्यान दोघांची भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. धोनीने जेव्हा कर्णधारपदाचा राजीनामा दिला, तेव्हा अचूक वेळ साधणाऱ्या धोनीला सलाम असे प्रसाद म्हणाले होते. कोहलीकडेच कर्णधारपद सोपवण्याची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासूनच सुरु झाली होती, अशी माहितीही प्राप्त झाली आहे.

चौधरींमुळे माहीचा राजीनामा!
नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यांदरम्यान चौधरी आणि धोनीचे संबंध चांगलेच ताणले गेले. गुजरात आणि झारखंड संघादरम्यान झालेल्या रणजी उपांत्य सामन्यात चौधरी यांनी धोनीकडे खेळण्याचा आग्रह धरला होता. मात्र, खेळण्यास नकार देत धोनीने संघासोबत मार्गदर्शक म्हणून राहण्याची तयारी दाखवली. धोनी मार्गदर्शन करत असतानाही झारखंड संघाचा या सामन्यात पराभव झाला होता. ही संधी साधून चौधरी यांनी 4 जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना फोन केला आणि धोनीला त्याच्या भविष्यातील प्लानबाबत विचारणा करण्यास सांगितले. चौधरी यांच्या सांगण्यावरूनच प्रसाद यांनी धोनीला फोन केला आणि भविष्यातील प्लानबाबत विचारणा केली. अशी विचारणा होणे हे धोनीसाठी धक्कादायक होते. त्यामुळे धोनीने त्याचदिवशी तडकाफडक राजीनाम्याचा निर्णय घेतला.

सप्टेंबरपासूनच हालचाली सुरु?
बीसीसीआयच्या नव्या निवडसमितीची घोषणा 21 सप्टेंबरला झाली आणि तेव्हापासूनच कर्णधारही बदलाची प्रक्रिया सुरु झाली. पाच सदस्यीय समितीला 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची बांधणी करायची होती. त्याची सुरुवात धोनीच्या कर्णधारपदापासून सुरु झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. धोनीने सध्या वयाची पस्तीशी ओलांडली आहे. 2019 पर्यंत त्याने 37 वर्ष पूर्ण केलेले असतील. त्यामुळे निवड समितीने विराट कोहलीकडेच संघाची धुरा देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या असे म्हटले आहे. धोनीने 4 जानेवारीला आपण वन डे आणि टी ट्वेण्टी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याचे जाहीर केले.