सोलापूर : राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सोलापूर येथील सात रस्ता परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रदेश पातळीपासून सर्व पदे बरखास्त करण्यात आले आहेत. आगामी काळात संघटनेला राजकीय ताकद मिळावी व चळवळ गतीमान करावी यासाठी नव्या कार्यकारणीत तरूणांना जास्तीचे प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या ११ जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यानंतर ११ फेबु्रवारीपर्यंत प्रदेश कार्यकारणी गठीत करण्यात येणार असल्याचीही माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. यावेळी कार्यकारणी गठीत करण्यासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आल्याचेही तुपकर यांनी यावेळी सांगितले.