मुंबई – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून पुण्याहून मुंबईपर्यंत काढण्यात आलेल्या आत्मक्लेश यात्रेचा समारोप करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे.
एका महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अन्यथा मुंबईसह मोठ्या शहरांचा भाजीपाला, दूध आदी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करू. आज गांधीजींच्या मार्गाने आंदोलन केले आहे. एक महिन्यानंतर हेच आंदोलन भगतसिंग यांच्या मार्गाने केले जाईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी मागण्यासाठी पुण्याहून निघालेल्या आत्मक्लेश यात्रेच्या शेवटच्या दिवशी सकाळी परळ येथून सुरूवात झाली. राज्यभरातून आलेले २५ ते ३० हजार शेतकरी यात सहभागी झाले होते. यात्रेमुळे लालबागपासून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली होती. भायखळ्याजवळ ही यात्रा पोलिसांनी रोखली. त्यानंतर तेथेच तिचे सभेत रूपांतर झाले.
या सभेला मार्गदर्शन करताना शेट्टी यांनी केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारवर टिकेची झोड उठवली. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनामुळे मी एनडीएमध्ये आलो. अहमदाबाद येथील प्रदीर्घ चर्चेत स्वामीनाथन आयोग स्वीकारा, राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग स्थापन करा, कृषीमूल्य निर्धारण आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता द्यावी या आपल्या मागण्या केल्यामुळेच आपण एनडीएत आलो. पण, केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे व राज्यातील फडणवीस सरकारला अडीच वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. याच कारणावरून भाजपा राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते रामपाल जाट यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर आपण लोकसभेत वैधानिक आयुधांचा वापर करून आवाज उठवला होता. अशासकीय ठरावातून चर्चाही घडवून आणल्या. आपण राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर केला नाही, तर शेतकऱ्यांसाठीच रस्त्यावर उतरलो. शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्याने आपण प्रायश्चित्त घेत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. संपकरी शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वर्षा निवासस्थानी चर्चेला बोलावले आहे. शेतकऱ्यांच्या संपाला माझा पाठींबा आहे, असेही ते म्हणाले.