राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचा वाद निकराला

0

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला वाद आता अंतीम टप्प्यात पोहोचला असून सत्तेतली भारतीय जनता पार्टी या वादात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामागे उभी राहते की सरकारला विरोध करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ देते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषि आणि पणन राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांनी संघटनेच्या व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले नसल्याचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना जाब विचारण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सदाभाऊंना नोटीस पाठवली असून चार जुलैला समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीत कांदा, तूर, सोयाबीन, कापूस, अशा पिकांच्या बाबतीत काहीहही केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कृषि आणि पणन राज्यमंत्री म्हणून आपण शेतकऱ्यांसाठी काहीही केले नसल्याचा दावाही करण्यात आला असल्याचे समजते.

सदाभाऊ कोत यांनीही या नोटिशीला उत्तर देण्याची तयारी केली असून नोटिशीतला प्रत्येक मुद्दा खोडून काढताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडला आहे. याऊलट राज्यमंत्री म्हणून आपल्याला असलेले मर्यादित अधिकार लक्षात घेता आपण केले काम पाहा. केंद्र सरकारकडे असलेले विषय मार्गी लावण्याची जबाबदारी आपली कशी काय, असा सवालही सदाभाऊ विचारण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी हे विषय लोकसभेत मांडण्यासाठी लॉबी तयार केली नाही. किंबहुना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात ते कमी पडले, असा पवित्राही सदाभाऊ यावेळी घेण्याची शक्यता आहे. अशावेळी सदाभाऊ खोत यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय गेतला जाऊ शकतो. त्यामुळे सदाभाऊंना मंत्रीपद सोडावे लागू शकते. अशावेळी मुक्यमंत्र्यांच्या पाठिशी मजबूतपणे उभे राहिलेल्या सदाभाऊंना ते कितपत साथ देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.