राजू शेट्टी-सदाभाऊ फारकत अंतिम टप्प्यात!

0

मुंबई:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खा. राजू शेट्टी विरुद्ध राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दोघांमधील फारकत अंतिम टप्प्यात आली असून सदाभाऊंना राजू शेट्टी यांनी दि. ४ जुलैपर्यंत ‘अल्टिमेटम’ दिला असून त्यानंतर त्यांना पक्षात ठेवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे शेट्टी यांनी पुण्यात आयोजित बैठकीत जाहीर केले तर मी पक्षाचा कार्यकर्ता असून मी स्वतः राजू शेट्टी यांना सामोरे जाईन व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईन असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

4 तारखेपर्यंत मुदत!
गेल्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची राज्य मंत्रीमंडळात कृषी व पणन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष हळूहळू वाढत गेला व शेवटी टोकाला गेला. याच संघर्षातून आता सदाभाऊ व शेट्टी यांच्यातील दरी कधीच न बुजण्याच्या अवस्थेत जाऊन पोहोचली आहे. आज खा. राजू शेट्टी यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाने सदाभाऊंना आपण ४ जुलैपर्यंत ‘अल्टिमेटम’ दिला असल्याचे सांगितले.

-खोतांबाबत अनेक तक्रारी
स्वभिमानीच्या कार्यकारिणी बैठकीत खोतांबाबत पदाधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे याबाबत खोतांनी ४ जुलैपर्यंत आपली बाजू मांडावी व त्यानंतर त्यांना पक्षात ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. सदाभाऊ खोतांबाबत आलेल्या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी पक्षाची समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीसमोर खोत आपली बाजू मांडतील असेही शेट्टी यांनी सांगितले. तसेच यापुढे सदाभाऊ खोत यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाणार नसल्याचे सांगत शेट्टी यांनी सदाभाऊंना निर्णायक इशाराच दिला.

-मी स्वतः शेट्टींशी चर्चा करणार:- ना.खोत
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मी लहान कार्यकर्ता असून पदाधिकारी नसल्यानेच मला या बैठकीचे निमंत्रण मिळाले नाही, असा टोला लगावला. मी कार्यकर्ता असून मला त्याचे समाधान आहे. त्यामुळे शेट्टी यांना मी स्वतः सामोरे जाईन व विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देईन, असे खोत यांनी सांगितले. मी लहान कार्यकर्ता असून ते मोठे आहेत. तसेच मी लोकशाही मानणारा माणूस आहे. त्यामुळे मी शेट्टी यांनी दिलेल्या ‘अल्टिमेटम’ची वाट पाहत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

-कर्जमाफीनंतरही ‘स्वाभिमानीचा’ संघर्ष
राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही राजू शेट्टी यांनी आपण अद्याप समाधानी नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने २५ जुलैपर्यंत वेळ द्यावी तोपर्यंत थांबण्यास तयार आहोत. मात्र त्यानंतर आम्ही थांबणार नाही, ‘स्वाभिमानी बाणा’ दाखवू असे सांगत शेट्टी यांनी पक्षाच्या सरकारमध्ये राहण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सूचित केले. मध्यप्रदेशात मंदसौर येथे येत्या ६ जुलैपासून किसान मुक्ती यात्रेची सुरुवात होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.