राजेंच्या अटकेचे कवित्व!

0

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अटकेवरून राजकीय कवित्व रंगले असतानाच, काल अखेर त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज. त्यामुळे त्यांच्या अटकेशी मराठी माणसाच्या भावना निगडीत आहेत, किंचितप्रसंगी त्या संतप्तही आहेत. काही मंडळी या मुद्द्याला भावनिक आधार देत, लोकांना भडकाविण्याचेही काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया नावाचा उतावळा घटक ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळताना दिसतो, त्यातून संबंधित लोकांच्या बुद्धिची कीव करावीशी वाटते. उदयनराजे हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत असताना, ते फरार असल्याच्या बातम्या याच उतावीळ मीडियाने दिल्यात, त्यामुळे ते अचानक सातारा आले आणि रात्रीचा रोडशोही केला. अगदी पोलिस आयुक्त कार्यालयासमोरून ते गेले परंतु, पोलिसांनी त्यांची अटक टाळून जनक्षोभ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. देशात लोकशाही आहे, राजेशाही नाही, याची जाणिव सर्वांनाच आहे. परंतु, छत्रपती शिवाजीराजे आणि त्यांचे छत्रपती घराण्यातील वंशज यांच्याविषयी तमाम मराठी माणसाला एक आदर आहे. लोकशाहीपेक्षाही हा आदर मोठा आहे. त्यामुळे ही माणसे रयतेचे राजे आहेत. देशातील कायदा सर्वांना बंधनकारक असताना तो उदयनराजेंसाठीही बंधनकारक आहे. देशात प्रत्येकाला कायदा पाळावा लागेल, कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर कायदेशीर प्रक्रियेलाही सामोरे जावे लागेल. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योगाच्या व्यवस्थापकाला खंडणी मागणे आणि त्याला मारहाण करणे, असे गुन्हे उदयनराजेंच्याविरोधात दाखल आहेत. हे गुन्हे खरे की खोटे? याचा सोक्षमोक्ष न्यायालयात लागेल. परंतु, गुन्हे दाखल झाले म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते, तशी मानसिक तयारी उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी करायला हवी होती. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने व तदनंतर उच्च न्यायालयानेही उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांना अटक करणे पोलिसांसाठी क्रमप्राप्त होते. अटक टाळणे हा राजेंचा हेतू होताच; परंतु कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याचीही त्यांची मानसिकता होती. परंतु, काही प्रसारमाध्यमे, राजकीय नेते आणि उतावीळ सोशल मीडिया यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आणि त्यांच्या अटकेला जातीय, राजेशाही अस्मितेची किनार देऊन हे प्रकरण चिघळवले. छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर नाही असा माणूस या राज्यात शोधूनही सापडणार नाही. उदयनराजे असो की अन्य कुणीही छत्रपती असो, त्यांच्याविषयी तमाम मराठी माणसांना नीतांत म्हणजे नीतांतच आदर आहे. या आदराला ठेच पोहोचविण्याचे काम मीडियाने केले. त्यात अनेकांनी राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. राजेंविरुद्ध दाखल झालेला मारहाणीचा गुन्हा आणि खंडणी मागितल्याचा आरोप खरा आहे किंवा खोटा आहे, हे न्यायालयात सिद्ध होईलच; परंतु प्रथमदर्शनी या प्रकरणामागे राजकीय हात असावा, असा संशय प्रत्येकाला येऊच लागला आहे. खरे तर या प्रकरणाला उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वादाची किनार दिसते. ज्या लोणंद येथील सोना एलाईज नावाच्या कंपनीवरुन हा प्रकार घडला, तेथे अनेक महिन्यांपासून कामगारांच्या वेतनवाढीवरून आंदोलन सुरु आहे. या कंपनीत राजे आणि निंबाळकर अशा दोघांच्याही कामगार संघटना आहेत. यातील रामराजेंच्या कामगार संघटनेतील कामगारांना जादा काम दिले जाते तर उदयनराजेंच्या संघटनेतील कामगारांना कमी काम दिले जाते यावरून उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते. यावेळी नेमके काय झाले हे नेमके ठावूक नसले तरी, उदयनराजेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याची तक्रार जैन यांनी पोलिसांत दाखल केलेली आहे. या तक्रारीचे तथ्य पोलिस तपासात पुढे येईलच; आणि त्याची सत्यता न्यायालय पडताळून पाहिलच; परंतु हे प्रकरण राजकीय आणि संघटनांच्या वादातून घडले हे तरी प्रथमदर्शनी दिसून येते.

कुणी तक्रार दाखल केली म्हणून राजे आरोपी ठरत नाहीत. कायदेशीर प्रक्रियेला त्यांना सामोरे जावेच लागणार आहे. कारण, ते राजे असले तरी कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळेच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी रितसर अर्जही न्यायालयाकडे केला होता. न्यायालयातील सुनावणीत तो अर्ज दोनवेळा फेटाळला गेला. त्यामुळे अटक टाळणे शक्य नाही हे राजेंसह सर्वांच्या लक्षात आले होते. बरं, उदयनराजे हे काही साधे नेते नाहीत; त्यांच्याही अंगात छत्रपतींचे रक्त खेळते आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी ‘फरार आहेत’ वैगरे बातम्या चालविताना काही वृत्तवाहिन्यांनी तारतम्य बाळगायला हवे होते. एक तर दोन लाखांची खंडणी मागितली हा आरोपच त्यांचा अपमान करणारा आहे. हजारो एकरच्या सातबारावर ज्यांचे नाव आहे, आणि पिढीजात अब्जावधींची मालमत्ता ज्यांच्या मालकीची आहे, असा राजा माणूस इतकी छोट्या रकमेची खंडणी मागणे शक्य नाही, याचे भानही आरोपकर्त्याने ठेवले नाही, आणि त्या आरोपाचा पराचा कावळा करणार्‍यांनी तर आपण काय काथ्याकूट करत आहोत, याचेही भान ठेवले नाही. त्यामुळे राजेंच्या पाठीमागे आरोप आणि अटकेचे शुक्लकाष्ठ म्हणजे फडणवीसी राजकारणाचे षडयंत्र असल्याचा समज तमाम मराठी माणसाचा झाला आहे. त्यामुळेच सरकारविरोधात जनमत निर्माण झाले. खुद्द उदयनराजेंनाही फरार म्हणणे पसंत पडले नाही, त्यामुळेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी सातारा येथे येऊन जाहीर रोड शो केला; पोलिसांना व कायद्याला एकप्रकारे आव्हान दिले. उदयनराजेंना हात लावण्याची पोलिसांची कालही हिंमत नव्हती आणि आजही नाही. कारण, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस त्यांच्या पाठीशी उभा आहे. पोलिसांनी काहीरी जोरजबरदस्ती केली असती तर हे राज्य पेटून उठले असते. त्यामुळेच स्वतःहून अटक करवून घेत उदयनराजेंनी पोलिस आणि एकूणच राज्य सरकारसमोरील एक मोठे संकट दूर केले. उदयनराजे छत्रपती असले तरी, ते कायदा पाळतात हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे देशातील कायदा व राज्यघटनेपेक्षा राजेंची काही तरी वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या त्यांच्या अनुयायांनाही या बाबीपासून बोध घ्यायला हवा. देशात लोकशाही असली आणि राजेशाही संपुष्टात आली असली तरी जनतेच्या मनावर राज्य करतो तो राजा. उदयनराजे यांचे जनतेच्या मनावर राज्य आहे, ते रयतेचे राजे आहेत. त्यामुळे लोकशाहीतही हे राजे मोठे ठरतात. राजेंच्या अटकेमागे राजकीय हेतू आहे, कुणाला तरी आपले राजकारण साधून घ्यायचे आहे; त्यामुळेच या प्रकरणाचे कवित्व रंगविले जात आहे.