राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडेंना स्थायीची ’लॉटरी’

0

सर्वसाधारण सभेत झाली निवड

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील भाजपच्या दोन नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी भाजपचे राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांनी ही निवड झाल्याचे जाहीर केले.

राजीनाम्यांमुळे झाली होती जागा रिक्त
महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी डावलले गेल्याच्या नाराजीतून सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या जागी राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे या दोघांची निवड करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे समर्थक जाधव हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांच्याबरोबरच निष्ठावंत गटाचे शीतल शिंदे आणि विलास मडिगेरी यांच्यादेखील नावाची जोरदार चर्चा होती. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी तेही इच्छूक होते. परंतु, ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे देऊ केले. परंतु, ते मंजूर केले नव्हते. स्थायी समिती सभापतीची निवडणूक पार पडल्यावर महिन्याभरानंतर जाधव यांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केला होता. तर, शीतल शिंदे यांनी गेल्या आठवड्यात स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपमहापौर शैलजा मोरे यांनी शिंदे यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला होता.