राजे आत्राम यांचा शाही विलंब!

0

गडचिरोली । जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान सुरेश तेलामी यांना पालकमंत्री राजे अंबरिश आत्राम यांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात येणार होती; मात्र एका विवाहसोहळ्यातील पाहुणचार घेण्यात गुंतलेले आत्राम तब्बल पाच तास उशिरा पोहोचल्याने तेलामी यांच्यावरील अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ आली. आत्राम यांच्या या वर्तनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कुटूंबिय वेळेवर हजर
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाला शेवटची मानवंदना देण्यात येणार होती. या मानवंदनेनंतर सुरेश यांचे पार्थिव न्यायचे असल्याने तेलामी कुटुंबीयसुद्धा गडचिरोलीत वेळेत पोहोचले होते. सुरेश यांचा केवळ 15 महिन्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. प्रशासनाने आपली तयारी सुध्दा पुर्ण केली होती. आधिकारी सुध्दा उपस्थित होते.

लग्न पाच तास उशिरा लागले
पोलीस मैदानात सगळे त्यांची वाट बघत असताना आत्राम हे अहेरी येथे एका कार्यकर्त्यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात गुंतले होते. विवाह उशिरा लागल्याने पालकमंत्री पाच तासांनी पोहोचले. तोवर मानवंदनेसाठी जमलेले वरिष्ठ अधिकारी, पोलीस जवान व शहीद सुरेश यांचे कुटुंबीय ताटकळत राहिले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नमदेखील आले होते. त्यांनाही मंत्र्यांच्या उशिरा येण्याचा फटका सहन करावा लागला. पालकमंत्री आल्यानंतर सुरेश यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. मानवंदना दीड वाजता असल्याची स्पष्ट कल्पना मंत्र्यांना देण्यात आली होती, असे एका पोलीस अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

विलंबामुळे पार्थिव नेणे अशक्य
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरेश तेलामी यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी नेण्यात येणार होते. हे गाव कृष्णार भामरागडपासून बरेच आत असल्याने पोलिसांनी व्यवस्था केली होती. मात्र अखेरची मानवंदनाच उशिरा झाल्याने पार्थिव लगेच गावी नेणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ तेलामी कुटुंबीयांवर आली. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आत्राम यांच्याशीर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

15 महिन्यांच्या मुलासह सगळेच ताटकळले!
शहीद जवान सुरेश लिंगा तेलामी यांना गडचिरोलीतील पोलीस मैदानात दुपारी अखेरची मानवंदना देण्यात येणार होती. अशा प्रसंगी पालकमंत्री उपस्थित राहण्याची प्रथा आहे. आत्राम यांना पोलिसांनी सकाळीच कल्पना दिली होती. पालकमंत्र्यांनी दीडच्या सुमारास गडचिरोलीत दाखल होणे आवश्यक होते, मात्र ते वेळेवर आलेच नाही. त्यामुळे जो जवान शहीद झाला त्यालाही मानवंदनेसाठी पालकमंत्र्यांची वाट पहावी लागली.