आदरणीय महोदय,
श्री. किशोरराजे निंबाळकर
(जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त जळगाव)
आपणास एका सामान्य जळगावकरातर्फे मानाचा मुजरा !
गेल्या काही दिवसांपासून आम्हा जळगावकरांना बसणारे आश्चर्याचे सुखद धक्के पाहता ‘हे स्वप्न तर नव्हे!’ अशा शंकेने आम्ही दररोज स्वत:ला चिमटे घेत आहोत. मात्र सत्य हे कल्पीताहून किती सुखकारक असू शकते याची प्रचिती आम्हाला येऊ लागली आहे. जळगावचे सिंगापूर-शांघाय तर सोडाच पण किमान नाशिक-औरंगाबाद तरी होईल की नाही? यावर आम्ही विचार करणेच सोडून दिले होते. मात्र आमचे हे प्राणप्रिय शहर किमान उत्तम जळगाव होऊ शकते यावर विश्वास बसू लागला आहे.
महोदय, आपला व्याप खूप मोठा आहे. मात्र जळगावातल्या 69 परगण्यांच्या सुबेदारीचा अतिरिक्त भार आल्यामुळे आपल्या जागी कुणी असता तर कंटाळूनच गेला असता. फार तर सतरा मजली बुरूजावरून जांभई देत नवीन अधिकाराने सुखावला असता, वा बुरूजावरून फर्मानवर फर्मान काढत काही तरी केल्याचा आव आणला असता. मात्र आक्रितच घडले. महापालिकेच्या लोकशाही दिनात आपण स्वत: अर्जदारांकडे जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या तेव्हा संबंधीतांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसणे स्वाभाविकच होते. आपण इतक्यावरच थांबला नाहीत. तर सतरा मजली बुरूजावरून जळगावचा 360 अंशात व्ह्यू (आम्ही स्मार्ट असल्याने उपमादेखील ‘स्मार्ट’ बरं का!) घेत आपण थेट समस्येच्या मुळावरच आघात करण्याचा निर्णय घेतल्याने उडालेला हलकल्लोळ अजून शांत होण्यास तयार नाही.
साहेब, रस्ते, पाणी, गटारी, वीज आणि स्वच्छता आदी मूलभुत सुविधांच्या पलीकडे कुणी अपेक्षा करत नाही. कारण ही पंचसूत्री वैयक्तीक आणि सार्वजनीक जीवनासाठी अत्यावश्यक या प्रकारातील आहे. जनतेला कोणत्याही भूलथापा मारू नका, स्मार्ट सिटी करण्याचा कोणताही आव आणू नका! फक्त या बाबी असल्या म्हणजे जनता निमुटपणे अन्य घटकांचा अभाव सहन करून घेते. आता आपल्याशी संवाद साधतांना या सगळ्या घटनांचा उहापोह करता येणार नाही. मात्र सतरा मजलीच्या बुरूजावरून कोणताही मनसबदार अथवा मांडलिकांना सुगावादेखील लागू न देता आपण थेट जळगावच्या रस्त्यावर उतरल्याचे ठरविले तेव्हा या तमाम मंडळीची उडालेली भंबेरी ही त्यांच्या चेहर्यांवर स्पष्टपणे दिसून येऊ लागली. व्हीआयपी मंडळी जळगावच्या गल्लीबोळातून फिरू लागली म्हणजे कोणती तरी निवडणूक आली इतके सोपे गणित आम्हाला कधीच माहित झालेय. मात्र कोणतीही निवडणूक नसतांना सतरा मजलीचे सरदार थेट रयतेशी संवाद साधू लागले तेव्हा आपला कुणी तरी नक्कीच वाली असल्याची जाणीव झाली.
आणि हो…आपल्या देशात भारत आणि इंडिया असे दोन भाग आहेत. एक गरीबांचा तर एक श्रीमंतांचा. त्याच पध्दतीने जळगावाचेही दोन भाग आहेत. एक ‘गरीब बिच्चारे’ तर दुसरे ‘चतुर आणि धनाढ्य’ ! शहरातील काही भाग चकाकता तर काही विकासापासून कोसो दूर ! आपल्याशी राजकीय बाबी बोलू शकत नाही…तरीही सांगतो. आपल्या परगण्यांमध्ये निवडून जाण्यापासून ते मलीदा चाखण्यापर्यंत सर्वपक्षीय सलोखा आहे. यातील आश्रितांना फेकले जाणारे विविध तुकडे आणि यातून जनतेची होणारी फरफट ही आपल्यामुळे जगाला समजली हेदेखील नसे थोडके! असो. आपण स्वच्छतेची झाडाझडती घेतली, गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेचा मुद्दा हाताळला याबद्दल आपले जाहीर अभिनंदन. मात्र आता याच्या पलीकडे असणारा अंधकार राजेंची प्रतिक्षा करू लागला आहे. शहरातून जाणार्या लेंडी नाल्याच्या सफाईच्या नावाखाली आजवर कोट्यवधी रूपये विविध ठेकेदारांच्या घशात गेले असले तरी सफाई नेमकी झाली किती हा संशोधनाचा प्रश्न आपण मार्गी लावाल ही अपेक्षा. याच नाल्याचा प्रवाह वळवून भूमाफियांनी हडपलेल्या जमिनीचा मुद्दाही आपण लक्षात घ्यावा. जळगावच्या काही भागातील कामांची पुनरावृत्ती तर काही भागात मुद्दाम रखडण्यात आलेल्या कामांमागे काही हेतू आहे का याचा शोधदेखील घेण्याची गरज आहे. शहराच्या प्रत्येक कॉलनीत राहणार्या नागरिकांची हक्काची जागा बहुतेक मांडलीकांना जहागिरीच्या स्वरूपात कशी वाटण्यात आलीय? या भुखंडांच्या श्रीखंडाचे लाभार्थी कोण? हे जळगावकर जाणून आहेच. मात्र या संधीसाधूंच्या मगरमिठीतून विविध भुखंड सोडवावे ही अपेक्षा गैर नाहीच. किमान परिसरातील बच्चे कंपनी सुट्टीत मोकळा श्वास तरी घेतील.
सर…कर्तव्यदक्ष अधिकारी खूप असतात. मात्र दबावांना झुगारून लावणे मोजक्यांनाच शक्य होते. जिल्ह्याची धुरा सांभाळतांना आपण कुणाला झुकते माप दिल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. याच पध्दतीने प्रभारी आयुक्तपदाचा आपला एक पंधरवडा भल्याभल्यांची झोप उडविणारा ठरला आहे. यामुळे आपल्या ‘प्रभारी’पदाचा कालखंड लवकरच संपुष्टात आणण्यासाठीच्या हालचाली नक्कीच सुरू झाल्या असतील. मात्र आम्ही अनुभवत असणारे स्वप्नवत सत्य हे जळगावच्या इतिहासातील एक मानाचे पान नक्कीच समजले जाणार आहे. याबद्दल आपले खूप-खूप आभार…!
आपलाच,
एक सामान्य जळगावकर