राज्यकर्त्यांकडून भांडणे लावण्याचे काम

0

मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात
मुक्ताईनगर । मराठा समाजाला आरक्षण देताना राज्यकर्त्यांची भुमिका संशयास्पद असुन राज्यात भांडणे लावण्याचे काम राज्यकर्ते करीत असल्याचा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडी सभेत बोलताना केला.

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय शेजारील प्रांगणात वंचित बहुजन आघाडी सभा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलतांना सांगितले की, विद्यार्थ्यांना हॉस्टेल मध्येच पूर्ण सुविधा देऊ. मागण्या मागूच नये अशी राज्यकर्त्यांची धारणा चुकीची आहे. संविधानाने मागण्या मागण्यांचे हक्क दिले आहे. मागण्या तपासण्याचे काम कोर्टाचे असल्याचे त्यानी सांगितले.

ओबीसीला 27 टक्के आरक्षणाला ‘अ’ आणि मराठा समाजाला मिळालेल्या 16 टक्के आरक्षणाला ‘ब’ असा हा कायदा मंजूर व्हावा. परंतु राज्यकर्ते भांडण लावण्याचा काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसींची आता स्वतंत्र चळवळ सुरू झाली आहे. आपला आमदार ओबीसी आमदार अशी चळवळ आहे. महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य नाही अवघे 169 कुटुंबाचे राज्य आहे. बाबासाहेबांनी शिक्षण हे सरकारची जबाबदारी ठरविली होती. आताचे सरकार कुटुंबाची जबाबदारी ठरवत आहे. उद्या सत्तेत आलो तर एसटी, एसीची शिष्यवृत्ती दुप्पट करू व ती ओबीसीला ही लागू करू. सत्ता काही कुटुंबाच्या हातात नको. यामुळे गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे, असे ही त्यांनी सांगितले.

भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मांडले यात कोथळी आश्रमशाळा प्रकरण, भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढून कारखाना होणार असल्याची बतावणी केली गेली आदी विषय मांडले. यावेळी माजी आ. दशरथ भांडे यांनी सांगितले की, येथील लोकप्रतिनिधी यांना मुख्यमंत्री पदाची संधी होती परंतु ते बहुजन आल्यामुळे डावलण्यात आले. सभेच्या सुरवातीला समता सैनिक दालने प्रकाश आंबेडकर यांना सलामी दिली भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी आ. बळीराम शिरस्कर, विवेक ठाकरे, भारिपचे विश्वनाथ मोरे, तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर, सुमित बोदडे आदी उपस्थित होते. रावेर मतदारसंघातून नितीन कांडेलकरांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातुन नितीन कांडेलकर यांची उमेदवारी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत जाहीर केली.