पुणे । अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत हक्क प्रदान करताना राज्यघटनेने त्यावर काही बंधने घातली आहेत. त्याच्या अधीन राहूनच पत्रकारांनीही सत्य कथन करून कर्तव्य पार पाडावे, अशी अपेक्षा भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली. विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिल्या जाणार्या देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार वितरणाच्यावेळी ते बोलत होते. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पराग पोतदार, व्यंगचित्रकार आणि जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आणि सोशल मिडीयावरील ब्लॉग लेखक देविदास देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. स्वामी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
…तर बदनामीचा खटला
राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मुद्दयांच्या आधारे अंकुश ठेवलेला आहे. स्वातंत्र, देशाची अखंडता याविरोधात वक्तव्य करणे, शत्रुची स्तुती करणे याला राज्यघटनेतील तरतुदींनुसार मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय धार्मिक अस्थिरता निर्माण करणे, सामाजिक शांततेस बाधा पोहोचेल, असे वक्तव्यही राज्यघटनेने वर्ज्य ठरवले आहे. सर्वसाधारणपणे पत्रकारांवर होणार्या टीकेमुळे बदनामीचा खटला दाखल केला जातो. मात्र अशा बदनामीच्या खटल्यात खोटी माहिती प्रसिद्ध झाली आहे, हे तक्रारदारानेच सिद्ध करायला हवे, असे स्वामी यांनी सांगितले.
लेखणीचा वापर करावा
पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी या क्षेत्रात उतरण्यापूर्वी आयआयटीच्या धर्तीवर दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य असले पाहिजे. तरच या क्षेत्रात गांभीर्याने आणि नितीमत्तेच्या आधारावर सत्य कथन करण्याचे काम होऊ शकेल. याशिवाय बातमीचा योग्य पाठपुरावा करणेही गरजेचे आहे. बर्याच वेळा वरवर दिसणार्या वेगळ्या बातमीचा पाठपुरावा केल्यास, वेगळेच चित्र उलगडू शकते. याआधारे सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा, असे डॉ. स्वामी म्हणाले.
पत्रकारांकडे हट्टीपणा हवा
बातम्यांमधील नेमके काय समजून घ्यायचे, हे समजावून सांगणार्याला खरा पत्रकार म्हणायला हवे. आजच्या वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चेमध्ये मूळ मुद्दयाला बगल देऊन विनाकारण बिनमहत्त्वाच्या मुद्द्यांवरच चर्चा होत असते. त्यातून उथळ पत्रकारिता करणार्या पत्रकारांचा अभ्यास नसल्याचेच निदर्शनास येते. सत्य बाहेर काढण्यासाठी पत्रकारांकडे हट्टीपणा असायला हवा, असे भाऊ तोरसेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर डॉ. सुप्रिया अत्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आनंद भिडे यांनी आभार प्रदर्शन केले.