काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : राजकीय फायद्यासाठी भाजप निव्वळ खोटे बोलत असून त्यांच्यामुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थान रचत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.
घटनेला वाचविण्याची जबाबदारी काँग्रेसची
काँग्रेस पक्षाला 133 वर्ष पूर्ण झाल्यान स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष म्हणून पक्षाच्या स्थापना सोहळ्याला राहुल यांनी प्रथमच संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशाची पायाभरणी करणार्या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्यासाठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी आहे. आज देशाशी धोकेबाजी केली जात आहे. भाजप राजकीय फायद्यासाठी खोटे बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण भलेही काही चांगले केले नसेल, भलेही आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो पण सत्याची कास सोडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.